काळेवाडी, ता.३ : काळेवाडी, रहाटणी परिसरातील गुंठामंत्र्यांचे लाडके चिरंजीव आणि परराज्यांमधून स्थायिक झालेल्या आयटीयन्स यांच्याकडील देशी-विदेशी महागड्या मोटारसायकली ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. दीडशे सीसीपासून पुढे साडेतीनशे सीसी व त्यापेक्षा जास्त सीसीपेक्षा अधिक इंजिन क्षमता असणारी वाहने घेण्याची व त्यात नियमबाह्य सुधारणा करण्याची चढाओढ लागलेली दिसून येत आहे.
काळेवाडी येथील तापकीर चौक, पाचपीर चौक, नवीन बीआरटीएस रस्ता, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा इत्यादी ठिकाणी वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. एकेरी रस्त्यावर विरुद्ध बाजूने जाणे, चौकात सिग्नल न पाळणे, ट्रिपल सीट, चारचाकी वाहनांना मोठ्या आकाराची ट्रॅक्टरसारखी चाके लावणे तसेच फॅन्सी नंबर प्लेट असे प्रकार सामान्य झाले आहेत. त्यातच आता अल्पवयीन मुले बुलेटसह इतर दुचाकी वाहनांना मोठ्या आवाजाचे सायलेंसर व हॉर्न बसवून नियमांची पायमल्ली करत आहेत. अनेकदा वाहतूक पोलिसांसमोरच हे प्रकार घडत असतात. मात्र, त्यांच्याकडून निव्वळ बघ्याची भूमिका घेतली जात असताना दिसून येते.
पोलिसांकडून दुर्लक्ष
नाशिक फाटा, भोसरी, नाना पेठ व इतर ठिकाणी असलेल्या वाहनांचे सुटे भाग विक्रीच्या दुकानांसह इतर दुकानांमधून सहजरित्या, बिनबोभाटपणे पोलिस असो की आरटीओ असो कोणाचीही भीती नबाळगता राजरोसपणे वाहनांमध्ये बदल केले जात आहेत. कंपनीकडून मोटारसायकलींना बसवण्यात आलेले सायलेंसर व हॉर्न काढून त्या जागी गॅरेज व वाहन डेकोरेटरकडून मोठ्या, कर्णकर्कश आवाजाचे व जणू दिवाळीत फटाके वाजावेत, त्याप्रमाणे सायलेंसर व हॉर्न बसवण्यात येत आहेत. या सर्व प्रकारांची माहिती पोलिस प्रशासनास असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस पोलिस करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मी एक सेवानिवृत्त कर्मचारी असून रस्त्याने जाताना नेहमी अल्पवयीन मुले मोठ्या फटाके वाजवल्यासारख्या सायलेंसरची वाहने चालवतात. त्यामुळे कानठळ्या बसतात. रस्त्यावर मोठा अपघातही होऊ शकतो. हा आवाज सामान्य नागरिकांना ऐकू येतो. पण पोलिस प्रशासनास का येत नाही?
- प्रकाश विसपुते, काळेवाडी
कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवत वेगाने वाहन चालवणारे शाळा- महाविद्यालयीन तरुण हे पोलिस प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. पोलिसांनी याबाबतीत सौम्य भूमिका न घेता या वाहनचालक मुले व त्यांच्या पालकांसह दंड करावा. जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी घडणार नाही
- मंगला दाभाडे, काळेवाडी
सांगवी वाहतूक पोलिसांमार्फत नियमबाह्य सायलेंसर, हॉर्नवर कारवाई करण्यात येत असून त्याविषयी कारवाई अधिक वाढवण्यात येईल. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सायंकाळी अधिक ताण असतो. अशी वाहने दिसतात; त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.
- प्रदीप पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, सांगवी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.