संदीप सोनार ः सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता. ६ : काळेवाडी, रहाटणी परिसरात लहान मोठे मॉल्स, मोटारी आणि दुचाकीचे शो रुम्स, राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेतेमंडळींची जनसंपर्क कार्यालयांसारख्या विविध ठिकाणी मोफत वायफाय आणि इंटरनेट सुविधा मिळत असल्याने तरुणाईला आता ऑनलाइन खेळ आणि व्हिडिओ बघण्याचे नवे व्यसन जडले आहे. त्याने सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडून गुन्हेगारीही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
काळेवाडी येथील तापकीर चौक, रहाटणीतील नखाते वस्ती चौक, रहाटणी गावाच्या छत्रपती चौकात अनेक ठिकाणी राजकीय पुढारी यांचे कार्यालय, शोरूम, मॉल्सजवळ अनेक तरुण फुकटच्या वायफायला बळी पडत असल्याचे परिसरात दिसत आहे. तरुणांमध्ये जनजागृती करुन व त्यांना यापासून दूर नेण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्थानिक राजकीय नेतेमंडळी, इतर कार्यालये व शोरूम मॉल येथील इंटरनेट वायफाय सुविधा बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. इंटरनेटच्या अधिक वापरातून तरुणांचे मानसिक व शारीरिक आरोग्यही खालावत आहे.
अमर्यादित डेटाचे दुष्परिणाम
निरनिराळ्या मोबाईल कंपन्यांनी ३ - जी नंतर ४ - जी व आता ५ - जी इंटरनेट सेवा सुरू केल्याने मोबाईल तंत्रज्ञानात प्रचंड प्रमाणात बदल झाला आहे. इंटरनेटच्या वापराचा वेग व वेळ वाढला आहे. कंपन्यांच्या विविध प्लॅननुसार एकदा रिचार्ज केल्यानंतर अमर्याद इंटरनेट डेटा मिळतो. मात्र, त्याचा अभ्यास आणि प्रगतीसाठी सदुपयोग न करता हा डेटा तरुणाईचा कर्तृत्व दाखविण्याचा उमेदीचा काळ गिळंकृत करत असल्याचे दिसून येत आहे.
तास न तास रील्समध्ये गुंग
एकीकडे धुम्रपान, मद्यपानासारख्या व्यसनांच्या आहारी तरुणाई गेलेली असताना महत्वाची कामे, अभ्यास किंवा शरीरासाठी तंदुरुस्तीसाठी व्यायाम, खेळ यासाठी वेळ न देत तरुणाई आता इंटरनेटला बळी पडली आहे. वेळेचे भान न ठेवता अनेक तरुण इंटरनेटच्या जाळ्यामध्ये तास न तास अधिकच गुंतत चालले आहेत. एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर व एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर रील्स पाहणारी तरुणाई जागोजागी दिसून येत आहे. त्यामध्ये सोशल मीडियावरील अपप्रचाराला तरुणाई बळी पडण्याचा आणि गुन्हेगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सतत मोबाईल व इंटरनेट वापरल्याने मानसिक क्षमतेवर परिणाम होऊन भावना, संयम व प्रतिकारक्षमता, नम्रता माणूस संपवून बसतो. अति प्रमाणात इंटरनेटचा वापर मानसिक संतुलन व संयम घालवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यातून कौटुंबिक व इतर वाद निर्माण होतात. विद्यार्थ्याची अभ्यासात प्रगती न होणे, आत्महत्या करणे तसेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. अमित लावेकर, मनोविकृती चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औंध
अमर्याद इंटरनेटचे दुष्परिणाम
- कुटुंबातील सदस्यांपासून भावनिकदृष्ट्या दूर जाणे
- शारीरिक, मानसिक आरोग्य धोक्यात
- कार्यक्षमपणा, बौद्धिक वाढ न होणे
- गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ
- शिक्षण, खेळ, विविध स्पर्धांपासून दूर होणे
- शारीरिक व्यायामापासून दुरावा
- सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.