तळेगाव दाभाडे, ता. ६ : मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण अशा चारही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अलीकडच्या काळात गुन्हेगारी वाढल्याने नागरिक भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने सुधारणा करून गुन्हेगारी रोखावी, अन्यथा पुढील अधिवेशनात प्रश्न तडीस लावू, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, ‘‘चोरी, सोनसाखळी हिसके, मटका-जुगार, अवैध मद्य, अमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे. गुन्हे कुठे होतात, गुन्हेगार कोण आहेत, हे आम्हाला माहीत आहे. जर पोलिसांना माहिती नसेल, तर आम्ही सांगायला तयार आहोत. पण कारवाई झाली पाहिजे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे.’’
वरिष्ठांचे कौतुक, स्थानिकांवर ताशेरे
जिल्हा पोलिस अधीक्षकांचा ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ अधिकारी म्हणून उल्लेख करताना करताना शेळके यांनी चारही ठाण्यांच्या कारभारावर भोंगळपणाचा ठपका ठेवला. ‘गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याने मावळ तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे,’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
---
आमदार शेळके यांचे मुद्दे
१) पर्यटन, औद्योगिक क्षेत्राला धोका ः लोणावळा हे देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण, तर वडगाव व कामशेत परिसर औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा. वाढत्या गुन्हेगारीमुळे दोन्ही क्षेत्रांना धोका
२) कडक कारवाई हवीच ः स्थानिक पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करावी
-----