तळेगाव दाभाडे, ता. ३० : मावळ तालुक्यात लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगर परिषदांसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, वडगाव नगरपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून इच्छुक महिला उमेदवारांनीही रणनिती आखणे सुरू केले आहे. निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे यंदा महिला उमेदवारांचा उत्साह आणि मोर्चेबांधणी गतिमान झाली असून, हा उत्साह थेट उत्सवात दिसून येत आहे.
तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिला इच्छुकांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दांडिया-गरबा स्पर्धा, भजन, कीर्तन, वारकरी संमेलने, महिला-बालकांसाठी उपक्रम अशा अनेक कार्यक्रमांमध्ये इच्छुक महिला उमेदवार प्रत्यक्ष सहभागी होत असून मतदारांशी संवाद साधत आहेत.
काही ठिकाणी त्यांनी मंडळांना आर्थिक सहाय्य तर केलेच, पण; कार्यक्रमांत प्रत्यक्ष उपस्थित राहून सामाजिक संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत मावळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेत अनेक महिलांनी आपल्या कामकाजाने छाप पाडली आहे. तर; नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. आरक्षणामुळे महिलांना संधी मिळाल्याने राजकीय स्पर्धा आणखी रंगतदार होणार असून अनेक नवीन चेहरेही पुढे येण्याची शक्यता आहे.
नवरात्रोत्सव हा महिलांचा सण मानला जात असल्याने महिला इच्छुकांनी यंदा हा उत्सव जनसंपर्काच्या प्रभावी मंचात बदलला आहे. उत्सवाचा उत्साह, महिलांची उपस्थिती आणि त्यांच्या मोर्चेबांधणीमुळे आगामी निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांचा निर्णायक प्रभाव पडणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
उपसभापती ते आमदार
मावळ तालुक्यात आतापर्यंत अनेक महिलांना राजकीय क्षेत्रात उच्चपदावर संधी मिळाली आहे. प्रामुख्याने पंचायत समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान स्व. डॉ. सुमनताई खेर यांना मिळाला. तर, रूपलेखा ढोरे यांना पंचायत समितीत उपसभापती ते आमदार होण्याचा मान मिळाला. लोणावळा नगर परिषदेत उषा चौधरी, सुरेखा जाधव, दीपिका आगरवाल, हेमलता आगरवाल यांना; तर पंचायत समितीत सभापती होण्याचा मान ज्योती शिंदे, निकिता घोटकुले, सुवर्णा कुंभार यांना मिळाला. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात सारिका नाईकवरे, अरूणा पिंजण, लीलाबाई काळभोर, आशा कस्पटे, यासह अनेक महिलांना स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत मान मिळाला आहे.
तळेगाव दाभाडे येथे ११ महिला नगराध्यक्ष
तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षपदाचा मान आतापर्यंत ११ महिलांना मिळाला आहे. यात शशिकला शहा, अंजलीराजे दाभाडे, विजया भांडवलकर, रंजना भोसले, मिरा फल्ले, संगीता धोत्रे, तारामती करंडे, शालिनी खळदे, चित्रा जगनाडे, माया भेगडे, सुलोचना आवारे यांना मिळाला आहे.