टाकवे बुद्रुक, ता. १५ : मावळातील मौजे ब्राह्मणोली येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर स्मृतीशिळेवर देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला आहे. दोन ओळींचा मजकूर यावर आहे. अनेक वर्ष उघड्यावर असल्याने वातावरणाचा परिणाम होऊन अक्षरे पुसटशी झाली आहेत.
शिलालेखात उल्लेख असलेल्या ‘भिकाजी काळे पाटील’ या व्यक्तीबद्दल इतर काहीही माहिती उपलब्ध झाली नाही. त्यांच्या नावाची माहिती दगडावर कोरून सर्वांसमोर ठेवणे हेच या शिलालेखाचे महत्त्व असल्याचे मानले जात आहे. या शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे यांनी केले आहे.
शिलालेखतील मजकूर
१ ।। भिकाजी पा. काळा ।।
२ ।। शके १७११ पौ.मास ।।
अर्थ : ‘‘शालिवाहन शकाच्या १७११ व्या वर्षी सौम्य नाम संवत्सरात पौष महिन्यात म्हणजेच सन १७८९ व्या वर्षी जानेवारीत भिकाजी काळा (काळे) पाटील यांची स्मारकशिळा किंवा समाधी तयार केली गेली असावी. किंवा त्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो’’
शिलालेखाचे महत्त्व : सदर स्मारक शिळेच्या वरील बाजूला सूर्य, चंद्र दाखवलेले आहेत. सूर्य, चंद्र याचा अर्थ ‘‘यावत चन्द्रो दिवाकरो विलसत स्तावत सभृज्ज्यमते’’ म्हणजेच जो पर्यत या पृथ्वीतलावर सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत यास्मारक शिळेची त्या व्यक्तीच्या नावाची व कार्याची कीर्ती दीर्घकाळ टिकून राहील. शिलालेखात नाव असलेले भिकाजी काळे हे गावचे पाटील असावेत. मध्ययुगीन काळातील हा स्मारकशिळा प्रकार आहे.
ताजे गावातही पाटलांची स्मृतीशिळा
मावळातील ताजे गावातही विठोबा केदारी पाटील यांच्या नावाची शिळा आहे. त्यावर ‘विठोबा केदारी पाटील’ असा मजकूर असून सोबत बैलगाडीसह चंद्र आणि सूर्याचे चित्रदेखील आहे.
ताजे येथील स्मृतिशीळेचा अर्थ
‘‘पूर्वी ‘पाटील’ हे गावचे मुख्य अधिकारी असायचे. त्यांच्याकडे निवाडा, कर वसुली, शेतीसंबंधी प्रश्न सोडवणे, गावचा कारभार बघणे अशी जबाबदारी असे. पाटील स्वतः मोठे जमीनदार किंवा शेतकरी असत. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर बैल, नांगर, जोते वगैरे सामग्री असायची. पाटलांकडे गावातील सामुदायिक कामांसाठी (उदा. विहीर खोदणे, मंदिर दुरुस्ती, रस्ते बांधणे) बैल वापरण्याची ताकद असे. पाटील म्हणजे गावचा प्रमुख आणि बैल म्हणजे शेतीचा प्रमुख आधार. गावातल्या सणासुदीला किंवा पोळा सणाला पाटील यांच्याच घरचे बैल प्रमुख मानले जात. गावच्या जीवनात दोघांचेही महत्त्व होते. एक शेतीसाठी, दुसरा प्रशासनासाठी. म्हणूनच येथील शिळेवर येथील पाटलांचे नाव व बैलगाडीचे चित्र कोरलेले असावे,’’ असे इतिहास अभ्यासक सांगतात.
मावळात लोणावळा, माऊ येथील पाटलांचे शिलालेख प्रसिद्ध झालेले आहेत. ब्राह्मणोली व ताजे येथील शिळेवरील लेख हे काळे व केदारी ही घराणी पाटील होती असे समजते.
-अनिल दुधाणे, इतिहास अभ्यासक
ताजे : याठिकाणी असलेल्या विठोबा केदारी पाटलांचा शिळेचा अभ्यास करताना अनिल दुधाणे.