टाकवे बुद्रूक, ता. १५ : यावर्षीची भातलावणी आणि बेनणीही उरकली आहे. तसेच भातपिकासाठी आवश्यक असणारा जोरदार पाऊस पडला आहे. भात रोपेही जोमाने उगवली आहेत. मावळातील धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे सध्याची पावसाची रिपरिप मावळकरांना नकोशी झाली आहे.
मागील आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. तसेच मावळात सकाळच्या वेळी दाट धुके देखील दिसत होते. त्यामुळे थंडीला सुरवात झाली असे वाटू लागले असतानाच रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रस्ते निसरडे झाले. त्यातच वातावरणातील बदलाने अनेकजण आजारी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक पाऊस उघडण्याची वाट पाहत आहेत.