टाकवे बुद्रूक, ता. १३ : कार्तिकी वारीनिमित्त कोकण भागातून आळंदीकडे निघालेल्या दिंड्यांमुळे मुंबई-पुणे महामार्ग भक्तिमय झाला आहे. मावळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत असून, नाश्ता-भोजनाची सोय तसेच विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विठ्ठलनामाच्या गजरात या दिंड्यांनी परिसरात प्रसन्न, भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे.
रायगडमधील उरण, पनवेल तसेच मावळ तालुक्यातील संत तुकाराम पादुकास्थान येथून निघालेल्या दिंड्यांमुळे गावागावांत भक्तांची मोठी गर्दी आहे. भगव्या झेंड्यांनी सजलेल्या दिंड्या, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-माउली-तुकाराम’च्या जयघोषांनी संपूर्ण महामार्ग दुमदुमला आहे. हजारो वारकरी तुळशीमाळा, भगवे वस्त्र परिधान करून विठ्ठलनाम जपत आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत. महामार्गालगत नागरिक जलपान, नाश्ता आणि फुलवर्षाव करून वारकऱ्यांचे स्वागत करत आहेत. अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनी अन्नछत्रांची व्यवस्था केली आहे. कामशेत, नायगाव, कान्हे परिसरात भक्तिभावाने भरलेले दृश्य पाहून वाहनचालकही थांबून माउलींचे दर्शन घेताना दिसले. वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून कामशेत पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
अपघात टाळण्यासाठी स्वतंत्र मार्गाची गरज
मावळात मागील काही वर्षांत वारकऱ्यांच्या अपघातांच्या घटना घडल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र मार्ग असायला हवा. भक्तिभावात दंग असलेले वारकरी काळजीपूर्वक चालत असले तरी बेशिस्त वाहनचालकांचा धोका कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या महामार्ग अरुंद करत आहे. त्यामुळे लोणावळा-देहू-आळंदी-पंढरपूर या मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग बनवल्यास अपघात तसेच वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
---