तळेगाव स्टेशन, ता. ५ : तळेगाव दाभाडे परिसरात दत्त जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विविध दत्त मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ अशा नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमला.
श्री दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप असल्याने दत्तजयंतीला विशेष महत्त्व असते. होमहवन, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांना भक्तांची गर्दी झाली. तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे, गावठाणातील जुने पोलिस ठाणे, नवलाख उंबरे येथील तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे, इंदोरी पोलिस चौकी, निळकंठनगर, तेली आळी, राजेंद्र चौक, महावितरण कार्यालय, विठ्ठलवाडीतील एसटी आगार, यशवंतनगरमधील कातवी मार्ग आदी ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये अभिषेक, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यशवंतनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या मंदिरात श्री दत्तगुरू सेवा मंडळातर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी कैलासबुवा पाटील आणि सहकाऱ्यांचे भजन झाले.
डी. पी. रस्त्यालगतच्या श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गच्या (दिंडोरी प्रणीत) समर्थनगर केंद्रातर्फे २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान अखंड नाम जप यज्ञ झाला. आठवडाभर गुरुचरित्र सामुदायिक पारायण सप्ताहात शेकडो महिला भाविकांनी भाग घेतला. शुक्रवारी (ता. ५) नाशिकमधील गणेश महाराज करंजकर यांचे श्री स्वामी समर्थ संगीतमय चरित्र प्रवचन झाले. यशवंतनगर केंद्रातर्फे गोळवलकर गुरुजी मैदानावर ओंकार जाधव मित्र मंडळातर्फे गुरुचरित्र पारायण सप्ताह झाला.
---