गणेश बोरुडे ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. २० : तळेगाव-चाकण मार्गावर प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने जणू अभयच दिले असावे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी (ता. १८) आणखी एक प्राणांतिक अपघात झाल्यानंतर तरी या बेजबाबदार रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
खराबवाडी ते महाळुंगे दरम्यान सेमको कंपनीजवळ झालेल्या अपघातात दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर इतर दोघे जखमी झाले. यामुळे नेहमी कोंडी होणाऱ्या रस्त्याबाबत वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कारवाईचा मुहूर्त काढणार का, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. चाकण-तळेगाव रस्त्यावरील इतर वाहनांवर तत्परतेने कारवाई करणारे तळेगाव, महाळुंगे आणि चाकण या वाहतूक विभागांसह पिंपरी चिंचवड आरटीओचे अधिकारी जाणीवपूर्वक मवाळ भूमिका घेतात, असा स्थानिकांचा आरोप आहे.
तीन चाकी रिक्षाची क्षमता तीनच प्रवासी असताना स्वतः तिरपा बसलेला चालक सहा पेक्षा जास्त प्रवासी कोंबतो. प्रवाशांचे सामान आणि हात पाय गाडीतून बाहेर डोकावत असतात. तर दुसऱ्या प्रकारच्या मोठ्या चार प्रवासी क्षमतेच्या रिक्षामधून तब्बल १० प्रवासी प्रवासी बसविले जातात. त्यातच हे चालक रिक्षा कोंडीतून, खराब रस्त्यावरून जमेल तसा मार्ग काढत बेफाम चालवितात. त्यामुळे नियंत्रण रिक्षा उलटून अपघात होतात. यात काही रिक्षा चालकांनाही जीव गमवावा लागला आहे.
बहुतांश रिक्षाचालकांकडे परवाना आणि विमा नसतो. विमा नसल्याने अपघातात मयत अथवा जखमींना आर्थिक मदत किंवा भरपाई मिळत नाही. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने अथवा चालकाकडे परवाना नसल्यामुळे अनेकदा विमा कंपन्या दावे क्लेम नाकारतात. त्यामुळेच मुळातच या रिक्षामधून प्रवास अवैध तितकाच जोखमीचाही ठरतो आहे. काही रिक्षा मुदत संपून कालबाह्य होऊनही रस्त्यावर धावत आहेत. काही रिक्षा चालक मद्यपान करून धोकादायक पद्धतीने वाहन चालवितात. प्रवासी आणि इतर वाहनचालकांना ते दादागिरी करतात. यामागे वाहतूक पोलिस आणि आरटीओची मोठी आर्थिक गणिते असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
एरवीही जनसेवेचा आव आणणारे स्थानिक दादा, भाई आपली नावे हुडवर छापून या रिक्षा चालकांना पाठबळ देत असावेत. बहुतांश रिक्षा या मुळ मालकाने इतर चालकांना भाड्याने चालविण्यासाठी दिलेल्या आहेत. इको वाहन चालकांची परिस्थितीही कमी अधिक फरकाने अशीच आहे. कायदेशीर परवानगी नसताना अनेक इको वाहने चाकण-राजगुरुनगर, चाकण -शिक्रापूर रस्त्यासह एमआयडीसीमधील अंतर्गत मार्गावर सर्रास अवैध प्रवासी वाहतूक करताना दिसतात.
कुठलेही सिग्नल अथवा वाहतुकीचे नियम धुडकावून लावत शेकडो रिक्षा चालक भर चौकात, रहदारीच्या रस्त्यावर गाड्या लावून प्रवाशांची चढ-उतार करतात. त्यामुळे रहदारीस अडथळा येऊन वाहतूक कोंडी आणि बऱ्याच वेळा छोटे मोठे अपघात होतात. तिथेही समोरील वाहनचालकांना अरेरावी करून चुक नसताना भरपाई उकळली जाते. रिक्षा आणि इको चालकांकडून नियमांची एवढी उघड पायमल्ली होत असताना इतर वाहनचालकांना किरकोळ कारणासाठी दंड आकारणारे वाहतूक पोलिस या बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांना मात्र अभय देताना दिसतात. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा फार्स केल्यानंतर काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे होते.
चाकण येथील तळेगाव चौकात अशा रिक्षांचा कायम गराडा असतो. विशेष म्हणजे महाळुंगे आणि चाकण वाहतूक विभागाच्या पोलिस चौकी लगतच पोलिसांच्या डोळ्यादेखत हे चालक वाहनांमध्ये प्रवासी भरतात. चाकणहून चारही दिशेच्या मार्गांवर किमान दर अर्ध्या तासाला वाजवी तिकीट दरात पीएमपीएल बसच्या फेऱ्या असूनही प्रवासी अशा अवैध वाहनांमधून प्रवास करून जीव धोक्यात घालताना दिसतात. याबाबत एमआयडीसी कामगारांसह प्रवाशांमध्ये जनजागृती गरजेची आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावर वाहतूक नियमनाचा पोलिसांवर ताण असणे स्वाभाविकच आहे. मात्र, याच कोंडीला काही अंशी कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अवैध रिक्षांसह इतर बेशिस्त, बेकायदेशीर वाहनांवर वाहतूक विभागासह आरटीओने सातत्यपूर्ण कारवाईद्वारे नियंत्रण ठेवावे, अशी भाबडी आशा कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना आहे.
---
एरवीही खाजगी कारमधे क्षमतेपेक्षा क्वचित एक जण जास्त असेल तरी त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. दुसरीकडे वाहतूक पोलिस अवैध वाहतुकीच्या रिक्षा, इको वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अप्रत्यक्षपणे त्यांना मदतच करत असावेत. अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांच्या अपघातांमध्ये सामान्य प्रवाशांचा जीव जातोय. त्यांना कोणी वाली नाही. कोंडीत भर घालणाऱ्या बेशिस्त रिक्षा आणि इतर अवैध प्रवासी वाहनांवर पोलिस आणि आरटीओकडून सातत्याने कारवाई करणे गरजेचे आहे.
- इक्बाल शेख, नागरिक, चाकण
---
चाकण वाहतूक विभागातर्फे आठवड्याला किमान दिडशे बेशिस्त आणि नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. गत आठवड्यात पाच रिक्षांवर कडक दंडात्मक कारवाई करून ७० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना शिस्त लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक, चाकण वाहतूक विभाग
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.