वडगाव मावळ, ता. २२ : ‘भविष्याच्यादृष्टिने ऊस क्षेत्र वाढविणे सयुक्तिक नसल्याने उपलब्ध लागवड क्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य ठरेल,’ असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलक यांनी केले.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यातर्फे सांगवडे येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमध्ये वापर’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, राजेंद्र कुदळे, धोंडिबा भोंडवे, भरत लिम्हण, छबूराव कडू, दत्तात्रय उभे, उमेश बोडके, दत्तात्रय जाधव, विलास कातोरे, शिवाजीराव कोळेकर, ज्योती अरगडे, माजी तज्ज्ञ संचालक ज्ञानेश नवले, माजी संचालक वसंत साखरे, भाऊसाहेब पानमंद, गोरक्षनाथ वाघोले, शंकर लोखंडे, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘एआय’ विषयातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. कडलक यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी किमान २० ते २५ शेतकऱ्याचा गट बनवून स्वयंचलित हवामान केंद्राची मदत घेण्यात येईल. उपग्रहावर आधारित मॅपिंग, मृदा आर्द्रता सेन्सर, मृद सेन्सर आदी सुविधा पुरविल्या जातील. यातून मिळणाऱ्या माहितीनुसार शेती सल्ला ठरविण्यात येईल. सर्वोत्तम सल्ला शेतकऱ्यांना मोबाईलवर माहितीच्या रूपातून दिला जाईल.
डॉ. गणेश कोडगीरे यांनी ऊस पिकावरील रोग, कीड व त्यावरील उपाययोजनेबाबत माहिती दिली. ठिबक सिंचन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विविध ऊस विकास योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कारखाना उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान वापरणे अनिवार्य आहे. त्यासाठी ठिबक सिंचन करणाऱ्या शेतक-यांना प्रति एकरी पाच हजार रुपये वाढीव अनुदान व कारखान्याचे सर्वतोपरी सहकार्य राहील.
संचालक भरत लिम्हण यांनी प्रास्ताविक केले.
---
खर्चाची विभागणी
२५ हजार ः योजनेतील सहभागासाठी प्रति हेक्टरी खर्च
९ हजार २५० ः व्ही.एस.आय.
६ हजार ७५० ः कारखाना
९ हजार ः शेतकऱ्याचा वाटा
---
‘एआय’ तंत्रज्ञानाचे फायदे
- रासायनिक खतांवरील खर्चात २५ ते ३० टक्के बचत
- पाण्याचे प्रमाण ३० ते ५० टक्क्यांनी कमी होणार
- जमिनीची हानी टळणार
- कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा वापर मर्यादित
- उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.