वडगाव मावळ, ता. १५ : मावळ तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाला असून, भात पिकासाठी काही भागात तो फायदेशीर तर काही ठिकाणी तो नुकसान कारक ठरण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. चांगले ऊनही पडत होते. मात्र, गेल्या दोन तीन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात वडगाव येथे २१ मिलिमीटर, तळेगाव दाभाडे येथे १८, लोणावळा येथे १६, खडकाळा येथे १५, काले कॉलनी येथे १६, कार्ला येथे १७ तर शिवणे येथे नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरातही अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. सध्या पडत असलेला पाऊस पूर्व भागातील भात पिकासाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र, यापूर्वीच्या पाण्याचा निचरा न झालेल्या भागातील भात पिकासाठी तो नुकसानकारक ठरण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. दमट हवामान व युरियाचा अती प्रमाणात वापर आदी कारणामुळे तालुक्याच्या काही भागात भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पवन मावळातील करुंज, बेडसे, येळसे तसेच कामशेत, वडगाव परिसरात तो अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे कीड नाशक औषधांची फवारणी करण्यात व्यत्यय येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी दिली. तालुक्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, तूर्तास भात पिकासाठी पावसाची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले. पावसामुळे फवारणी केलेली औषधे वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे औषध फवारणी करताना स्टिकरचा (चिकट द्रव) वापर करावा जेणेकरून औषधे वाहून जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.