वडगाव मावळ, ता. ३ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार वडगाव नगरपंचायतीने मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले. २ ऑक्टोबर रोजी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचे सन्मान करण्यात आले. शहराच्या हद्दीवर असलेल्या कातवी-तळेगाव रस्त्याच्या ठिकाणी मुख्याधिकारी डॉ. निकम यांच्यासह कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या सहभागाने रस्त्याच्या दुतर्फा पडलेला कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली व सुमारे तीन मेट्रिक टन कचरा जमा करण्यात आला. यामध्ये सुमारे ७० कर्मचारी सहभागी होते. तत्पूर्वी या अभियान कालावधीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी स्कूल, अध्यापक विद्यालय, कला वाणिज्य बीबीए महाविद्यालय यांनी अभियानात सहभाग घेत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असे विविध उपक्रम राबविले.
‘स्वच्छता ही सेवा- सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानांतर्गत वडगाव नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना आरोग्यासंबंधी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्ड काढण्यात आले व प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० योजनेची माहिती देण्यात आली. पात्र कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या अभियानाची सांगता करताना मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी शहरातील नागरिकांना कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत वर्गीकृत स्वरूपात टाकावा. प्लॅस्टिकचा वापर टाळावा. नगरपंचायतमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवावे व नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. शहरात नियमित कचरा पडणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जे नागरिक उघड्यावर कचरा टाकताना आढळतील अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.