वडगाव मावळ, ता. २३ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मावळ तालुक्यातील जांभूळ, कान्हे व इंदोरी ग्रामपंचायतीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आढावा घेतला व विविध विकास कामांचे उद्घाटन केले.
या दौऱ्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात आदी उपस्थित होते. जांभूळ येथे ग्रामपंचायत कार्यालय, जांभूळ व सांगवी येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या, पशुवैद्यकीय दवाखाना या सर्व शासकीय कार्यालयांना आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र गजानन पाटील व शालिनी कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कापडी पिशव्यांचे वाटप व क्यूआर कोडच्या बॅनर्सचे अनावरण करण्यात आले. ‘लखपती दीदी’ प्रमाणपत्रांचे वाटप केले. तालुक्यातील एकमेव सर्व सुविधायुक्त असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी केली. गावच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या लोकांचे व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी कल्याणी लोखंडे यांच्या कामाचे कौतुक केले.
कान्हे-नायगाव ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. तहसीलदार विक्रम देशमुख व गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी ग्रामपंचायतीतील प्रलंबित आणि सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या बायोगॅस प्रकल्पाचे पाटील यांनी कौतुक केले. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेने आर्थिक साहाय्य दिले असून, हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संतोष शिंदे यांनी दिली. शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाटील यांनी पाहिली. विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच विजय सातकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासात गटविकास अधिकारी प्रधान यांच्या सतत मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी इंदोरी ग्रामपंचायतीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत येणाऱ्या मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतली. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र पाटील व कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ई-चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. पाच टक्के अपंग निर्वाह भत्ता धनादेशाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. करभरणा क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले. येथील डिजिटल शाळेची व तालुक्यात एकमेव उभारण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्टची त्यांनी पाहणी केली. सरपंच शशिकांत शिंदे, इतर पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी अरुण हुलगे आदी उपस्थित होते.