वडगाव मावळ, ता. १३ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व साहाय्यक वित्त लेखा अधिकारी यांची भेट घेऊन मागण्या मार्गी लावण्यासाठी साकडे घातले.
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाने गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. पगाराव्यक्तिरिक्त रखडलेल्या अतिरिक्त बिलांसाठी मुदतवाढ मिळालेली असून, ज्या-ज्या शिक्षक बंधू भगिनींची बिले तपासायची राहिली असतील ती बिले लवकरात लवकर तपासून मिळावी, जेणेकरून दोन तारखेपर्यंत सदर बिले अपलोड करता येतील. या मागणीबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शिक्षकांनी त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्यात. जेणेकरून बिले काढण्यास सोईस्कर होईल, असे आवाहन करण्यात आले.
वेतन झाल्यानंतर सोसायटीचा धनादेश लवकरात लवकर देण्यात येईल. मेडिकल, बालसंगोपन व अर्जित रजा पंचायत समिती स्तरावरून लवकरात लवकर मान्य करण्यात येतील. मागील दोन-तीन वर्षांपासून रखडलेले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार लवकरात लवकर घेण्यात येतील. सर्व शिक्षक शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करून आजपर्यंतच्या सर्व नोंदी पूर्ण करण्यात येतील. निपुण महाराष्ट्र परीक्षेमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचे उच्चार वेगळे असल्यामुळे असे विद्यार्थी निपुण ठरण्यास अडथळे येत असल्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष शोभाताई वहिले, जिल्हा संघाचे माजी सरचिटणीस अण्णासाहेब ओहोळ, माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव जरग, महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मलाताई काळे, मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष सुरेखा औटी, माजी कार्याध्यक्ष राहुल जाधव, कोषाध्यक्ष यशवंत काळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
---