वाकड, ता. २१ : वाकड येथील चौधरी पार्क परिसरातील रस्त्यांवर बेकायदा दुतर्फा पार्किंगमुळे त्रस्त झालेल्या शेकडो संतप्त रहिवाशांनी रविवारी (ता. २१) रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी करत बेकायदा पार्किंगचा निषेध केला. तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त घालून दंड आकारावा, अशी मागणी त्यांनी केली.
काही महिन्यांपासून चौधरी पार्कमधील रहिवाशांना बेकायदा पार्किंगच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
बाहेरील ट्रक, जेसीबी, टुरिस्ट कार यासारख्या वाहनांमुळे पूर्णपणे अडकून पडत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने संतप्त रहिवाशांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले. जोरदार घोषणाबाजी करत बेकायदा पार्किंग रोखणे, नियमित गस्त आणि दंड आकारणीची व्यवस्था, महिला, मुले-ज्येष्ठांच्या सुरक्षेला प्राधान्य, शाळा आणि वृद्धाश्रमाजवळ विशेष वाहतूक नियम लागू करणे आदी मागण्या रहिवाशांनी केल्या.
रहिवाशांच्या मते, सकाळी ७ ते ९ या वेळेत शाळकरी मुलांना बसण्यासाठी किंवा चालण्यासाठी जागा मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तर हा त्रास दुहेरी आहे, कारण अवजड वाहनांमुळे रस्ते अरुंद होतात आणि अपघाताची भीती वाढते. कधीकधी तर चालण्यासाठीही जागा नसते. मुलांना शाळेत उशीर होतो आणि ज्येष्ठांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी अडचणी येतात. हे असेच चालू राहिले; तर परिसरातील सुरक्षा धोक्यात येईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांना निवेदन देऊन रहिवाशांनी आंदोलनाची सांगता केली. मुकेश सोनवणे, भूषण गरुड, राहुल तायडे, जयेश जगताप, प्रशांत पापळ व अन्य रहिवाशांनी संयोजन केले.
विविध सोसायट्यांतील रहिवाशांचा सहभाग
चौधरी पार्क परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायट्या, शाळा आहेत. शिव समृद्धी ए, सेंटोसा पॅराडाईज, ब्लू बेल्स, शिव दर्शन, नीलांबरी, सनराइज, साई श्रीष्टी ए आणि बी, शिवम नित्या, सौंदर्या, स्कायलाइन अॅट वाकड, शिवम मॅजेस्टिका इत्यादी सोसायट्यांतील रहिवाशांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रस्ते हे सार्वजनिक मार्ग आहेत. पण, आता त्यांचा सर्रासपणे बेकायदा पार्किंगसाठी उपयोग केला जात आहे. आम्ही यावर वारंवार पत्रव्यवहार केला. आजही शांतपणे मागण्या मांडल्या आहेत. पण, यानेही प्रश्न सुटला नाही; तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.
- भास्कर गायकवाड, रहिवासी, शिवम मेजस्टिका सोसायटी, चौधरी पार्क
WKD25A09535
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.