हिंजवडी, ता. १६ : आयटी पार्क हिंजवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीत शिकणाऱ्या दर्शन सुधीर अडसोड याने जिल्ह्यातील २४ विद्यार्थ्यांसह शनिवारी पहाटे अमेरिकेच्या नासा दौऱ्यासाठी आकाशात झेप घेतली.
अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या दर्शनची दहा दिवसांच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाल्याने त्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. मूळचे मराठवाड्यातील हे कुटुंब रोजगारासाठी काही वर्षांपूर्वी हिंजवडीत स्थायिक झाले. त्याचे वडील सुधीर सुरक्षारक्षक आहेत. आई पल्लवी घरकामे करतात. त्याला वर्गशिक्षिका उन्नती शेंडेकर, मुख्याध्यापक बापू येळे यांच्यासह शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा परिषदेने इस्त्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थांच्या भेटीसाठी सहावी आणि सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तीन टप्प्यांत परीक्षा घेतली. पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेला १३ हजार ६७१ विद्यार्थी बसले. यातून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम १० टक्के विद्यार्थ्यांची निवड ऑनलाइन परीक्षेसाठी झाली. त्यातील सर्वोत्तम १३ टक्के विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली. आयुकामध्ये ऑनलाइन परीक्षेतून निवड झालेल्या २३५ विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. यातून ७५ विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यापैकी २५ विद्यार्थ्यांना नासा, तर ५० विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या भेटीसाठी संधी मिळाली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
---
आमच्या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी दर्शन अडसोड नासा भेटीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. ही बाब शाळेसाठी, तसेच हिंजवडी गावासाठी खरोखरच खूप अभिमानास्पद आहे. दर्शन भविष्यात हिंजवडीचे नाव आपल्या कर्तृत्वाने नक्कीच मोठे करेल यात शंका नाही.
- बापू येळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, हिंजवडी
---