बेलाजी पात्रे
सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. १९ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असला, तरी कोणत्याही प्रमुख पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. परिणामी प्रचारादरम्यान इच्छुक उमेदवारांची अवस्था बिकट झाली आहे. ‘पाया पडतो, आशीर्वाद द्या; पण सध्या पक्ष विचारू नका,’ अशी विनवणी करीत त्यांचा प्रचार सुरू आहे.
प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार घराघरांत जाऊन संपर्क साधत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, विकासाचे व्हीजन दाखवणे, सामाजिक कार्यक्रमांत उपस्थिती लावणे असे सुरू आहे. पक्ष, चिन्ह आणि अधिकृत उमेदवारीबाबत प्रश्न विचारला तर मात्र या उमेदवारांची कोंडी होते. ‘वेळ आली की सांगू,’ असे गोलमाल उत्तर देत ते पुढे निघून जात आहेत.
या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांची युती, आघाडी होणार की नाही याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. याचा थेट फटका उमेदवारांना बसत आहे. प्रचाराची दिशा, खर्च आणि रणनीती ठरवताना ते अडचणीत सापडले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची वाट पाहतानाच अनेकांनी ‘स्वतंत्र ओळख’ जपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दुसरीकडे, पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढल्याने गटबाजी, नाराजी आणि दबावतंत्राचे राजकारणही सुरू आहे. उमेदवारी मिळेल की नाही, याची खात्री नसतानाच प्रचारात उतरल्याने आर्थिक आणि मानसिक ताण वाढत आहे. काही ठिकाणी तर ‘पक्ष जाहीर झाला तरच प्रचार’ अशी भूमिका घेत प्रचार थंडावल्याचे चित्र आहे.
मुख्य म्हणजे नागरिकांमध्येही संभ्रम आहे. ‘पक्ष कोणता, धोरण काय’ असे थेट प्रश्न विचारले जातात, पण स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने उमेदवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवडणुकीचे बागूल वाजले असले तरी अद्यापही प्रमुख उमेदवारांची घालमेल सुरूच आहे. त्यामुळे सध्या मात्र पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराचा सूर आशीर्वादापुरताच, तर पक्ष मात्र अजूनही ‘गुपित’ असाच आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.