भोसरी : लॅाकडाऊनमध्ये रिक्षा चालकाकडून दुप्पट भाडे आकारणी होत असे. नाईट शिफ्टला बनाच्या ओढ्यात अंधाराचे साम्राज्य असल्याने एकटीने प्रवास करणे भितीचे वाटत होते. पण पाच रूपयात पीएपीची अटल बससेवा उपलब्ध झाल्याने घराच्या काही अंतरावर बस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे चांगलीच सोय झाली असल्याचे दिघीतील परिचारिका सुमन केंगले सांगत होत्या.
(ता. २५) आॅक्टोबर रोजी पीएमपीएमएलद्वारे फक्त पाच रुपयात पाच किलोमीटरच्या अंतरावरील बससेवा सुरू केली. यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पहिल्या दिवशी एक हजार ३११ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. तर दररोज दोन हजार १२१ प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये भोसरी सद्गुरु आगार डेपो अंतर्गत प्रवास करणाऱ्या सरासरी प्रवाशांची संख्या सर्वाधिक एक हजार ३२ आहे.
या विषयी पीएमपीच्या भोसरीतील सद्गुरु डेपोचे व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी सांगितले, की अटल बससेवेद्वारे प्रवाशांना पाच किलोमीटर अंतरावरून मुख्य बस स्थानकापर्यंत आणले जाते. त्यामुळे प्रवाशांना शहरातील इतर इच्छित ठिकाणी प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे.
पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, पीएमीपीएमएलने सुरू केलेल्या अटल बससेवेला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. दिवसेंदिवस प्रवासी संख्याही वाढत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरपरिसरात अटल योजनेद्वारे पन्नास टक्केच बस सुरू असून प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच इतरही मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहेत.
प्रवासी संजय बांबळे म्हणाले, पाच रूपयात बस असल्याने रिक्षा चालकांद्वारे होणारी प्रवाशांची पिळवणूक थांबली आहे. दिघीतून भोसरीत येण्यासाठी मुख्य बस स्थानकापर्यंत पायपीट करावी लागत होती. मात्र दिघीतील राजे छत्रपती संभाजी महाराज चौकातून पहिल्यांदाच बससेवा सुरू झाल्याने चांगली सोय झाली आहे.
रिक्षा चालक जवळच्या भाड्यापोटी ३० ते ५० रुपये भाडे आकारत होते. आता रिक्षा चालक अधिकच्या भाड्यापोटी अडून बसत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्याचप्रमाणे अटल बस योजना सुरू असलेल्या चौकात थांबणाऱ्या रिक्षांचाही संख्या कमी झाली असल्याने चौकांनी काही प्रमाणात मोकळा श्वास घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अटल योजनेद्वारे सुरू असलेल्या बससेवा
भोसरी डेपो - भोसरी ते दिघी, चऱ्होलीगाव ते आळंदी, भोसरी ते संतनगर, संतनगर ते भोसरी, निगडी (पवळे चौक) ते रुपीनगर, चऱ्होलीगाव ते आळंदी.
पिंपरी डेपो - पिंपरी (डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक) या बस स्थानकावरून पवारवस्ती, काळेवाडी फाटा, पिंपरीरोड वर्तूळ, मोरवाडी आदी बस स्थानके, पिंपरीगाव ते भाटनगर
निगडी डेपो - देहूरोड ते देहूगाव, चिंचवडस्टेशन ते डांगे चौक, चिंचवड गावातून चिंचवडगाव वर्तूळ, केशवनगर, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा, वाकडगाव, डांगेचौक आदी बस स्थानके, आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून डीवाय पाटील कॅालेज, वाल्हेकरवाडी, चापेकर चौक, बिजलीनगर, संभाजी चौक आदी स्थानके
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.