Tatas, Fredie Mercury and Other Bawas book review esakal
प्रीमियम अर्थ

देशातील एकूण पारशी मंडळींची संख्या जेमतेम ५०-६० हजार एवढीच का? तरीही मोठे योगदान..

पुस्तक परिचय : द टाटाज, फ्रेडी मक्युर्री अँड अदर बावाज

सकाळ डिजिटल टीम

पुस्तक-परिचय

सुधीर सेवेकर
sevekar.sr@gmail.com


‘द टाटाज , फ्रेडी मक्युर्री अँड अदर बावाज : अँन इंटिमेट हिस्ट्री ऑफ द पार्सिज’ असे लांबलचक शीर्षक असलेले, ज्येष्ठ पत्रकार लेखिका कुमी कपूर यांचे पुस्तक अलीकडेच पेंग्विन बुक्स या प्रख्यात प्रकाशकांनी बाजारात आणले आहे.

नावाप्रमाणेच हे पुस्तक पारशी समाजाची आणि काही ठळक पारशी घराण्यांची, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कूळकथा सांगणारे आहे.

सोप्या ओघवत्या इंग्रजी भाषेतील हे पुस्तक रंजक-रोचक तर आहेच; शिवाय भरपूर सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यापारी माहिती देणारेही आहे. अभ्यासपूर्ण आणि भरपूर संशोधन करून लिहिलेले आहे.

एका सर्वेक्षणानुसार आज देशातील एकूण पारशी मंडळींची संख्या जेमतेम ५०-६० हजार एवढीच आहे आणि दर दशकागणिक तीमध्ये घटही होते आहे. त्याची अनेक कारणेही आहेत. म्हणजे ‘मायक्रोस्कोपिक कम्युनिटी’ अर्थात सूक्ष्मदर्शक यंत्रातूनच पाहता येईल एवढा हा समाज आकाराने, संख्यने छोटा राहिलेला आहे.

तो प्रामुख्याने मुंबई-नवसारी-सुरत या पट्ट्यातच वसलेला आहे. कारण एकेकाळी पर्शिया- इराणमध्ये ज्यांचे साम्राज्य होते, त्या या समाजाचा सिकंदराने पराभव केला. त्यानंतर अरब आले आणि या समाजास आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले, असा इतिहास आहे.

त्यातील बहुतांश जण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दीव, सुरत, भडोच या बंदरभागात साधारण आठव्या शतकात उतरले. तेव्हा तिथे जडी राणी नामक राजाचे राज्य होते. त्याने परवानगी दिली, आणि हे लोक तिथेच वसले. यथावकाश मुंबईत आले.

आधुनिक काळात म्हणजे ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पारशांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. राजकारणापासून बागायती, संशोधन, व्यापार, कारखानदारी, शिक्षण, वकिली व न्यायदान, बिल्डर, डॉक्टर, चित्रपट अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले.

दादाभाई नौरोजी, होमी भाभा, सॅम माणेकशॉ, जमशेटजी टाटा, अर्देशीर गोदरेज, वाडिया, पूनावाला, खंबाटा, भरुचा, झुबिन मेहता अशा अनेक नररत्नांनी भारताच्या समृद्धीत भर घातलेली आहे.

मुंबईतील नरिमन पॉईंट, वीर नरिमन रोड ज्यांच्या नांवे आहे, ते नरिमन कोण, त्यांचे योगदान काय हे मात्र आपणास माहित नसते.

ते खुशस नरिमन हे लोकमान्य टिळकांचे प्रखर समर्थक होते. जगात पहिल्यांदा तिरंगा फडकाविणारी महिला (भिकाजी कामा), मुंबई हायकोर्टातील पहिली महिला वकील (मिथन लाम), सौंदर्यवती पर्सिस खंबाटा अशा कितीतरी पारशी महिलांचेही योगदान मोठे आहे. औद्योगिक संदर्भात टाटा हे नांव तर विश्वविख्यात आहेच.

पण जहाजबांधणी उद्योग, कापडउद्योग, (वाडिया घराणे), भारतात छायाचित्रण व्यवसाय रुजविणारी (होमी व्यारावाला), दस्तूर मिस्त्री, कांगा, भरुचा, दिवेंच्या, पूनावाला अशा अनेक घराण्यांचे योगदानही मोठे आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्टस, जहांगीर आर्ट गॅलरी, पेटिट लायब्ररी, जे जे हॉस्पिटल, देशातील एक जुने वृत्तपत्र मुंबई समाचार (१८२२) अशा अनेक संस्था पारशी मंडळींनी उभ्या केल्या. टाटा उद्योगसमूहाच्या संस्था व देशउभारणी करणाऱ्या कार्याची यादी तर खूप मोठी आहे.

बॉंबे पारसी पंचायत (BPP) ही या समाजाची एक शिखरस्थ संस्था, त्यांच्याकडे पारशी समाजाची माहिती, आकडेवारी, कार्यकर्तृत्वाच्या नोंदी हे सगळे उपलब्ध आहे. संख्येने खूप लहान; पण आर्थिकदृष्टया श्रीमंती, सुबत्ता असलेला हा एक शांतीप्रिय समाज आहे.

पारशी महिलांच्या योगदानाविषयी पुस्तकाच्या एकूण बारा प्रकरणांपैकी एक स्वतंत्र प्रकरण आहे. क्रिकेट, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील पारशी मंडळींच्या योगदानाचाही एक स्वतंत्र चॅप्टर आहे. जागतिक संगीतात झुबिन मेहता आणि रॉकसिंगर फ्रेडी मर्क्युरी अफाट लोकप्रिय आहेत.

महायुद्धाच्या काळात, स्वातंत्र्यलढ्यात पारशी मंडळींच्या कामगिरीची चर्चा आहे, तशीच ती एड्स, कोविड या महासाथीसंदर्भातही आहे. त्यांचे योगदानही लेखिका आपल्याला सांगते.

पारशांच्या महानपणाची सविस्तर नोंद करीत असतानाच पारशांमधील आपापसातच विवाह करण्याची पद्धत, परजातीत लग्न केले तर त्यांना बहिष्कृत करण्याची प्रथा, लग्नच न करण्याचे वाढते प्रमाण अशा काही त्रुटी किंवा गुणदोषांबाबत; तसेच पारंपारिक विचारांचे आणि पुरोगामी विचारांचे पारशांमधील संघर्ष हेही लेखिका चर्चिते.

हा समाज आरक्षण मागत नाही, कोणत्याही सोयी-सवलती मागत नाही. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर पुढे जातो, जगात नाव कमावतो, याचा अभिमानही प्रस्तुत लेखिकेच्या या पुस्तकात आपल्याला जाणवतो. ऐतिहासिक, सामाजिक अशा अनेक संदर्भात पुस्तकाचे मोल मोठे आहे, यात वादच नाही.


द टाटाज, फ्रेडी मक्युर्री अँड अदर बावाज
लेखिका : कुमी कपूर
पृष्ठसंख्या : ३३४, किंमत : रु. ५९९
प्रकाशक : पेंग्विन बुक्स, गुरुग्राम (हरियाना)


(लेखक आर्थिक घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत. मोबाईल ९८३४०६६७४७ / ७६६५६८२९०)
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT