Consumer safer new car saptahik
साप्ताहिक

Car Safety Rating : आता अधिक सुरक्षित कार

कार उत्पादकांना क्रॅश टेस्ट भारतातच करता येणार असून ग्राहकांनाही आता सेफ्टी रेटिंगनुसार कार खरेदी करणे शक्य होणार आहे.

सागर गिरमे

रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘भारत न्यू कार अ‍ॅसेसमेंट प्रोग्रॅम’ येत्या काही दिवसांत अमलात येईल. त्यामुळे कार उत्पादकांना क्रॅश टेस्ट भारतातच करता येणार असून ग्राहकांनाही आता सेफ्टी रेटिंगनुसार कार खरेदी करणे शक्य होणार आहे.

भारतामध्ये गेल्या काही वर्षांत कारविक्रीमध्ये उल्लेखनीय वाढ झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यासोबत महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची संख्या आणि त्यातून होणारे मृत्यूही त्याच पटीने वाढलेले आहेत.

त्यामुळे आता रस्ता सुरक्षा हा अगदी कळीचा मुद्दा होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून ‘भारत न्यू कार अ‍ॅसेसमेंट प्रोग्रॅम’ (BNCAP) सरकारमार्फत राबविला जाणार आहे. या कार्यक्रमातून देशातील वाहनांच्या सुरक्षेला अधिक चालना मिळणार असून वाहन क्षेत्रावर त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे.

आवश्यकता का ?

भारतामध्ये द्रुतगती महामार्गांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबरीने उपलब्ध रस्तेही चांगल्या दर्जाचे झालेले आहेत. परिणामस्वरूप प्रवासाचा वेळ कमी होऊन तो आरामदायी होत आहे. मात्र अपघातांचे प्रमाण वाढतेच असल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची आणि जखमींची संख्याही वाढते आहे.

अपघातांची संख्या कमी होऊन गाड्यांची सुरक्षा अधिक वाढविण्यासाठी सुरक्षा रेटिंगद्वारा मूल्यांकन आणि त्यात सुधारणा करून या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी भारत एनसीएपी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

भारतीय कार कंपन्यांना आपली वाहने सुरक्षा रेटिंगसाठी ग्लोबल एनसीएपीकडे द्यावी लागतात. मात्र आता भारत एनसीएपीमुळे भारतातच या तपासण्या होऊ शकणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने यासंदर्भातील अंतिम निकष ठरवले असून, भारत एनसीएपी या यंत्रणेच्या माध्यमातून यावर देखरेख ठेवली जाणार आहे.

भारत एनसीएपी कशासाठी ?

सुरक्षा निकषांचे प्रमाणीकरण : या यंत्रणेच्या माध्यमातून भारतात विक्री होत असणाऱ्या वाहनांना आता प्रमाणित निकषांच्या रचनेच्या माध्यमातून चाचण्या द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे सर्व वाहने सुरक्षेच्या बाबतीत एकसमान पातळीवर येऊ शकणार आहेत.

सेफ्टी फीचरबाबत प्रोत्साहन : भारत एनसीएपीमार्फत वाहनांमध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचरचा समावेश करण्यासंदर्भात उत्पादकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामध्ये एअर बॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पादचाऱ्यांसाठी संरक्षण प्रणाली अशा विविध फीचरचा समावेश करण्यात आलेला आहे.

ग्राहकांमध्ये जागरूकता : केवळ कार उत्पादक कंपन्यांमध्येच नाही, तर ग्राहकांमध्येही वाहन सुरक्षेच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून सुरक्षा रेटिंग प्राप्त वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढेल.

क्रॅश टेस्ट महत्त्वाची

क्रॅश टेस्ट हा भारत एनसीएपी या यंत्रणेतील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये सिम्युलेटेड पद्धतीने कार क्रॅश करून सुरक्षिततेच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येते. याद्वारे वाहनांच्या पुढील भागात आघात झाल्यानंतरचे परिणाम, तसेच वाहनाच्या बाजूने झालेले परिणाम तपासले जातात.

या सोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींचीही तपासणी केली जाते. क्रॅश टेस्टमधून कारची रचनात्मक अखंडता, प्रवाशांचे संरक्षण आणि विविध सुरक्षा वैशिष्ट्यांचा प्रभाव यासारख्या मापदंडांचे मूल्यांकन केले जाते.

भारत एनसीएपीद्वारे देण्यात येणारे सुरक्षा रेटिंग महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. वाहनांच्या सुरक्षेच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन ग्राहकांना समजेल अशा पद्धतीने दिले जाणार आहे. क्रॅश टेस्टमधील वाहनांच्या कामगिरीवर हे रेटिंग आधारित असून, शून्यापासून ते पाचपर्यंत चढत्या क्रमाने हे रेटिंग दिले जाते. उच्च रेटिंग, म्हणजेच ५ हे रेटिंग सुरक्षेच्या दृष्टीने वाहनाची परिपूर्णता दाखवून देते.

सुरक्षेवर सकारात्मक परिणाम

या प्रणालीमुळे भारतातील वाहनांच्या सुरक्षेवर लक्षणीय परिणाम होणार आहे. त्यामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची किंवा जखमींची संख्या कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वाहन उत्पादकांना त्यांच्या वाहनांच्या सुरक्षा फीचरमध्ये वाढ करण्यास आग्रह धरण्यात आलेला आहे.

त्यामुळे उच्च रेटिंग मिळवण्यासाठी अत्याधुनिक प्रगत सेफ्टी फीचरचा समावेश करून वाहने अधिक सुरक्षित होणार आहेत. हे सेफ्टी रेटिंग विश्वासार्ह असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करून ग्राहकांना वाहन खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या गाडीबाबत ग्राहकाला विश्वास वाटेल.

निकोप स्पर्धा

या यंत्रणेमुळे कार उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन वाहने अधिकाधिक सुरक्षित करून, त्यासाठी उच्च रेटिंग मिळवण्याचे प्रयत्न सगळ्याच कंपन्या करतील.

त्यासाठी अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याने स्पर्धा निर्माण होऊन त्याचा लाभ ग्राहकांना होईल आणि अधिक सुरक्षित वाहन त्यांच्या हाती पडेल.

किमती वाढण्याची शक्यता

भारतातील आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीमुळे वाहन उत्पादकांसमोर या निकषांचे पालन करणे हे मोठे आव्हान असणार आहे. याचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची उभारणी करावी लागणार आहे. या निकषांची पूर्तता करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

अर्थातच त्याचा परिणाम वाहनांच्या किमतीवर होऊ शकतो. त्यामुळे वाहन सुरक्षा आणि परवडणाऱ्या किमती यांचा समतोल राखणे ही मोठी कसरत असणार आहे. तसेच भारतातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने निकष आणि क्रॅश टेस्ट बाबतीत सतत अभ्यास करून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

भारत न्यू कार अ‍ॅसेसमेंट प्रोग्रॅम हे देशातील वाहन सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सुरक्षा रेटिंग, क्रॅश टेस्टचे निकष आणि अत्याधुनिक सेफ्टी फीचरचा वापर करून वाहनांचे डिझाईन तयार करण्यासाठी कार उत्पादक कंपन्या याद्वारे प्रोत्साहित होतील.

यासोबतच ग्राहकांमध्ये सुरक्षेच्या बाबतीत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित प्रवास होण्याच्या दिशेने आपली वाटचाल होईल, हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT