girnar journey experience
girnar journey experience 
साप्ताहिक

चैतन्याचे गुरुशिखर!

धनंजय उपासनी

गिरनार पायथ्याशी आश्रमात आलो. भोजनप्रसाद झाल्यावर रात्री अकरा वाजता पायथ्याशी जमलो. शिखरावर जाण्यासाठी चढ-उतार आणि पायऱ्‍या असल्याने आधारासाठी काठ्या बरोबर घेतल्या.

पहिल्या पायरीवर डोके टेकले आणि सद्‍गरूंना प्रार्थना केली, ‘महाराज, आम्हाला गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी आणि आपल्या पादुकांचे दर्शन घडवावे.’ सामूहिक जयजयकार झाला आणि पुढील सगळा प्रवास महाराजांवर सोपवून शिखराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...

रोजचे काम सुरू असताना मनात राहून गेलेल्या गोष्टींची जुळवाजुळव आणि काही ना काही नियोजन सुरूच असते. राहून गेलेली एखादी गोष्ट खिडकीतून निसर्ग बघताना आठवते. एखादी वास्तू, एखादे मंदिरसुद्धा मनातील गोष्टीचा ठाव घेऊन राहून गेलेल्या गोष्टींचे स्मरण करून देतात.

मध्यंतरी असाच एक अनुभव ऑफिसला जाताना आला. श्री दत्तगुरूंचे मंदिर दिसले आणि त्या मंदिराने गुजरातमधील पवित्र ठिकाण श्री क्षेत्र गिरनारला जायचे आहे या गोष्टीचे स्मरण करून दिले.

गीरच्या जंगलात सिंह बघायला गेलो होतो, त्यामुळे गिरनारच्या आजूबाजूचा परिसर माहीत होता; पण गुरू शिखरावर जाऊन दर्शन घ्यायचा योग काही जमून येत नव्हता. जीवनात कोणतेही शिखर गाठायचे असेल तर गुरुकृपा पाहिजे, त्यामुळे आपण योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा करावी, असे माझे मत आहे.

गिरनारचे वर्णन पुस्तकात, मासिकात वाचले होते. वाचन सुरू असताना दत्त महाराजांशी संबंधित अनेक स्थळांची माहिती वाचनात येत होती. मध्यंतरी ‘हिरण्यगर्भ- कहाणी ब्रह्मांडनायकाची - श्रीस्वामी समर्थांची’ या पुस्तकात ‘योगीराजांची गिरनार यात्रा’ हे प्रकरण वाचण्यात आले आणि त्याआधी श्री शंकर महाराजांचे चरित्र वाचत असताना ‘गिरनारच्या पर्वत रांगा आकाशाशी हितगूज करत होत्या,’ असे वर्णन वाचण्यात आले होते.

तेव्हापासूनच गिरनारला जायची आंतरिक ओढ निर्माण झालेली होती. भगवंताला भक्ताची हाक आणि प्रार्थना लगेचच कळते असे म्हणतात ना! अगदी तसाच अनुभव मला आला. केदार नावाच्या मित्राचा मला अचानक फोन आला, ‘आम्ही काही मित्र गिरनारला जातोय, यायचे का?’ मी ‘हो’ म्हणायच्या आधी अंगावर फक्त शहारे आले.

कारण गिरनारला जायचे आहे असा विचार सुरू असताना आलेला हा फोन, म्हणजे मनातील साद देवाने ऐकली होती, याची पावतीच होती असे जाणवले. मित्राला विचारले, ‘कधी जायचे आहे?’ त्याने सांगितले, ‘आज संध्याकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशनला भेटा.’ मी फक्त ‘श्री गुरुदेव दत्त’ एवढेच बोलून फोन ठेवला, कारण हे फारच आश्चर्यकारक होते माझ्यासाठी. लगेचच आजच प्रवास सुरू करायचा म्हणजे अजूनच आनंद झाला.

ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षणाचा छंद असल्यामुळे अशी अचानक भटकंती वारंवार होत असल्याने बॅग बऱ्‍यापैकी भरून तयार असते. प्रवासाची तयारी करताना सकारात्मक भावना ठेवावी आणि धार्मिक स्थळाला जाताना फक्त श्रद्धेने निघावे. सगळे काही सुरळीत होत जाते. सगळी धावपळ करून स्टेशनवर वेळेत पोहोचलो.

गाडीत बसलो आणि आठ वाजता गाडी अहमदाबादच्या दिशेने निघाली. गाडी सुरू झाल्यावर एक विचार स्पर्श करून गेला, आज दिवसभर प्रवासाचे नियोजन सुरू असताना मानसिक, शारीरिक खूप धावपळ झाली; पण कुठेच काही अडथळा आला नाही. एवढेच काय? रोज त्रासदायक वाहतूक कोंडी असते, पण आज वाहतूक कोंडीलासुद्धा सामोरे जावे लागले नाही.

एवढे सगळे पटापट सहजपणे कसे काय जमून आले? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना बर्थवर बेडशिट घातले आणि शाल अंगावर घेऊन पाठ टेकली. तेव्हा लगेचच दुसरा विचार असा मनात आला- जीवनात सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायची नसतात तर चित्त एकाग्र करून वैश्विकशक्ती असलेल्या चैतन्याच्या गुरुशिखराला हात जोडावेत, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

अहमदाबादहून पुढे जाणारी जुनागढ ट्रेन तीन तासांनी होती. स्टेशनवर ढोकळा, जिलबी, फाफडा असे गुजरातची खास ओळख सांगणारे पदार्थ खाऊन पुढील प्रवास जुनागढच्या दिशेने सुरू झाला.

संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास जुनागढला पोहोचलो. जुनागढला प्रवेश केल्यावर तीन डोंगर रांगा दिसत होत्या. टमटम करून गिरनार पायथ्याशी आश्रमात आलो. सगळे मित्र फ्रेश झाले. आश्रमात छान मंदिर होते. एका झाडाखाली मी शांतपणे थोडा वेळ जाऊन बसलो, तेव्हा मंदिराच्या परिसरात काही लहान मुले खेळत होती आणि मंदिरात भजन सुरू होते.

मुले खेळण्यात दंग होती आणि साधक भजनात तल्लीन झाले होते. दोन्ही प्रसंगांना निरागसतेची झालर होती. आश्रमात भोजनाची सोय झाल्याने बरे वाटले. भोजनप्रसाद झाल्यावर रात्री अकरा वाजता पायथ्याशी जमावे असे ठरले.

ठरल्याप्रमाणे बरोबर असलेले सगळे मित्र जमले. शिखरावर जाण्यासाठी चढ-उतार आणि पायऱ्‍या असल्याने आधारासाठी काठ्या बरोबर घेतल्या. ‘भीमरूपी महारुद्रा..’ म्हणून सगळ्यांनी मारुतीरायाला नमस्कार केला, मनोभावे हात जोडले.

पहिल्या पायरीवर डोके टेकले आणि सद्‍गरूंना प्रार्थना केली, ‘महाराज, आम्हाला गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी आणि आपल्या पादुकांचे दर्शन घडवावे.’ सामूहिक जयजयकार झाला आणि पुढील सगळा प्रवास महाराजांवर सोपवून शिखराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

पायऱ्‍या चढाईला सुरुवात झाली. काही ठिकाणी अजून दिव्याचा प्रकाश असल्याने टॉर्चची गरज नव्हती. खूपजण प्रथमच हा अनुभव घेत असल्याने मानसिक तणाव तर थोडा होताच. सगळे एकमेकांना मदत करून पुढे जात होते.

कालांतराने ज्याचा वेग ज्याच्याशी जमला तसा गट आपोआप निर्माण होत गेला. पुढे जाऊन एकमेकांची वाट बघत थांबायचे आणि सगळे नजरेच्या टप्प्यात आले की नामस्मरण करून पुन्हा वाटचाल सुरू व्हायची. वळण यायला सुरुवात झाली होती, त्यामुळे अंधारात पुढील वाट नीट शोधून पुढे जावे लागत होते.

आता टॉर्चचा प्रकाश आवश्यक होता. आपण शोधले की दिशा सापडतात आणि दिशा सापडली म्हणजे वाटा कळायला लागतात. डोळे आणि काळोख यांचा समन्वय झाल्यामुळे पायऱ्‍यांवरून जाणाऱ्‍या वाटा नीट कळत होत्या. समन्वय माणसाला दिलासा देतो, तर श्रद्धा प्रकाशाची वाट दाखवते असे विचार मनात येत होते.

अधूनमधून सुरक्षित जागा दिसली की त्या जागेवर दोन पाच मिनिटे थांबून, कधी खडीसाखर खाऊन, तर कधी पाणी पिऊन शरीरातील ऊर्जा कायम ठेवत होतो. कधी चालण्याचा वेग कमीजास्त झाल्याने किंचितसे अंतर एकट्याने चालावे लागत होते. एक एक पायरी काळजीपूर्वक चढत असताना पायरी विषयावर मनात हिंदोळे सुरू झाले.

पायरीबद्दलचे वाक्प्रचार आता आठवत होते. वडीलधारी मंडळी खूप वेळा सांगायचे, ‘आपली पायरी सोडू नये’, ‘पायरी सांभाळून वागावे’, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’, ‘एक एक पायरी आत्मविश्‍वासाने चढत चढत यशापर्यंत पोहोचावे’ अशी अनेक वाक्ये पायरीबाबत संदेश देत होती.

तेव्हा लक्षात असे आले, की आज गुरुशिखराकडे जाणारी प्रत्येक पायरी म्हणजे चिंतन, नामस्मरण, आईवडिलांचा आदर, संयम...पायरीची अशी बरीच रूपे समोर येत होती. गुरुशिखराकडे जाणाऱ्‍या प्रत्येक पायरीत शिकवण आहे हेच खरे. कधीकधी एकटे चालण्यामुळे आत्मसंशोधन करायची संधी मिळते, असे जाणवत होते.

साधारणपणे पहाटे तीनच्या सुमारास पहिल्या डोंगरावर अंबामाता मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. आसमंतात भरून राहिलेली शांतता फारच आनंद देणारी होती. पुस्तकात वाचलेले ‘योगीराजांची आणि अंबाभवानीची भेट’ हे सगळे वर्णन डोळ्यासमोर आले. केवढे चैतन्य असणार त्या भेटीत... अंबाभवानीला मनोभावे नमस्कार केला.

निरभ्र आकाशाकडे बघितले, तर चांदण्या खूपच छान दिसत होत्या. दुसऱ्‍या डोंगरावर गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन डोंगर उतरायचा आणि मग तिसरा डोंगर चढून गेल्यावर श्री दत्तात्रयांच्या पादुका असलेल्या शिखराकडे जायचे होते. अंदाजे सहा-साडेसहा तास चालून पहाटे साधारण साडेपाच वाजता आम्ही शिखरावर पोहोचलो.

वातावरणात गारवा होता, पण रात्रभर चालणे झाल्यामुळे शरीरात ऊब निर्माण झाली होती. मंदिर अजून उघडायचे होते. आमच्या आधी काही भाविक पोहोचले होते. त्यांच्या शेजारी बसून मंदिर उघडण्याची वाट बघत होतो. माता, पिता आणि गुरू यांचा सहवास म्हणजे भाग्याचे लक्षण असते, असे विचारचक्र सुरू असताना पुजारी येताना दिसले मंदिर उघडले.

आरती सुरू झाली. हात जोडले गेले, डोळे मिटले; मन शांत शांत होऊन निर्विचार अवस्थेकडे पोहोचले होते. आता शब्द संपले, स्वसंवाद सुरू झाला होता. आजूबाजूला थोडी गर्दी असूनसुद्धा अलिप्तपणा निर्माण झाल्याने एकांताचे महत्त्व उमजले.

त्या नीरव शांततेत हृदयाचे स्पंदन आणि श्वास एवढाच काय तो आवाज मला जाणवत होता. या सगळ्या पवित्र वातावरणात मन असताना आरती पूर्ण झाली. प्रतीक्षा संपली आणि भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी आत मंदिरात प्रवेश मिळाला. दत्तात्रयांच्या मूर्तीचे, पादुकांचे दर्शन झाले. पादुकास्थानी पोहोचलो होतो त्यामुळे सगळा थकवा क्षणात कमी झाला.

बाहेर आल्यावर बघितले तर सूर्य उगवत होता. आसमंत प्रकाशित होत असताना अंतरंगातसुद्धा एक दिव्य ज्योत प्रकाशित झालेली होती. सुंदर रंगछटा आसमंतात दिसत होत्या. पूर्वरंगाची उधळण विध्यात्याने केली होती.

आपणसुद्धा आपल्या जीवनाच्या वाटेवर काही काळ जरी अंधारात आणि चढ उताराच्या संघर्षात घालवलेला असेल, तर आशेचे किरण घेऊन सुखाची पहाट नक्की पूर्वरंगाने प्रकाशमान होणारी असते... ते दृश्य बघून असेच मनात येत होते.

आपण किती उंचावर आलो आहोत, हे सूर्यप्रकाशात खाली बघितल्यावर समजले! दर्शन घेऊन गुरुशिखराच्या पायऱ्‍या उतरायला सुरुवात झाली. काही पायऱ्‍या गुळगुळीत असल्याने खूप सावकाश उतरत होतो. थोडे खाली आल्यावर कमानीतून डाव्या बाजूच्या रस्त्याने कमंडल कुंडाकडे गेलो. आतमध्ये गेल्यावर समोर एका खोलीत धुनी होती दर्शन घेतले.

प्रसाद आणि चहा घेतला. हात धुवायला गेल्यावर एक गुरुजी पाणी वाया जाऊ नये म्हणून स्वतः एका तांब्याने प्रत्येकाच्या हातावर पाणी घालत होते. पाणी वाचवणे किती महत्त्वाचे आहे, असा संदेश सगळ्यांना देत होते. कमंडल दर्शन घेऊन पायऱ्‍या चढून वर आल्यावर परतीचा मार्ग सुरू झाला. आता उजाडले असल्याने सगळे स्पष्ट दिसत होते.

उतरत असताना रात्रीच्या काळोखात नजरेस न पडलेला थरार, आव्हान, संयम, कौशल्य या बाबी प्रत्येक वळणावर समोर येत होत्या. निसर्गात भटकंती करतो तेव्हा शिस्त काटेकोर पाळावी, म्हणजे अपघात होण्याची शक्यता खूपच कमी असते. पर्वत चढताना धोके आणि लहरी हवामान याचा सामना सतत करावा लागतो. खबरदारी आपण घ्यावी, रक्षण गुरुदेव करतातच, असे मनन करत करत पायथ्याशी पोहोचलो.

दुसऱ्‍या दिवशी वेरावळहून रेल्वे असल्याने रात्री मुक्कामाला सोरटी सोमनाथला गेलो. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान आहे. रमणीय आणि समुद्र किनारा असलेले हे ठिकाण फार छान आहे. मंदिर परिसर प्रशस्त आहे. कडेकोट बंदोबस्त असतो. भव्य गाभारा आणि प्रसन्न शिवलिंग बघून खूप आनंद वाटतो. पहाटे आरतीला गेलो तेव्हाचा क्षण तर अविस्मरणीय असाच होता.

सगळा आनंद मनात साठवून रेल्वेने परतीचा प्रवास सुरू झाला. हात जोडून गुरुदेवांना नमस्कार केला. मनापासून प्रार्थना केली, सगळ्या प्रवासात नकळत काही चुकले असेल तर क्षमा असावी. सगळ्यांचेच शरीर थकलेले दिसत होते, पण डोळ्यातील भाव परमोच्च क्षण अनुभवले आहेत अशी ग्वाही देत होते.

संपूर्ण प्रवासात यापूर्वी जाऊन आलेले आमचे अनुभवी मित्र राजाभाऊ यांची खूप मदत झाली. त्यांना आणि सगळ्या मित्र परिवाराला धन्यवाद दिले. आपल्या अंतरंगात डोकावून बघितले, तर धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण शारीरिक किती तंदुरुस्त आहोत? आणि आरोग्याकडे अजून किती लक्ष द्यावे लागणार आहे?

याचे उत्तर गिरनारच्या शिखरावर जाताना नक्कीच मिळते. आपण मनात विश्वास ठेवून कृती करावी म्हणजे अशक्यही शक्य होत जाते... जीवन सुंदर आहे आणि असे अनुभव आल्यावर ते अधिक सुंदर होत जाते हेच खरे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT