asha bhosale
asha bhosale esakal
साप्ताहिक

Marathi Song :तरी उत्तम गाणी विसरून कसं चालेल राव?

Shraddha Kolekar

माधव गवाणकर

दसऱ्याचं सोनं लुटण्याची प्रथा आता कोकणातही कमी झाली आहे. आसपासची मराठी माध्यमातली लेकरं आपट्याची पानं घेऊन ‘काका, सोनं घ्या’ म्हणून हमखास यायची. ‘इंग्रजी माध्यम’ काही हल्ली येत नाही. जुन्या गाण्यांचं सोनं तरी त्यांना कुठे ठाऊक आहे?

मला आठवतं, विद्यार्थी असताना मी पुणे आकाशवाणी ऐकायचो. रत्नमाला या जुन्या ध्वनिमुद्रिकांच्या कार्यक्रमासाठी! घरातले बाकीचे लोक पुणं ऐकायचे ‘सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे’ यासाठी!

रत्नमालामधून अचानक

अंगणात खेळे राजा रंगरंगुनी

चांदण्यात रंग सारे माखमाखुनी

हे गीत आणि मालती पांडेंचा स्वर ऐकू यायचा. ती कोलंबिया रेकॉर्ड होती. आमच्या नात्यातलं एक गोजिरं बाळ अंगणात खेळताना पाहून माझ्या आईने, आशा गवाणकरांनी, ते भावगीत रचले. मालतीबाईंनी स्वतः चाल लावली होती.

संगीतनियोजन दत्ता डावजेकरांचं होतं. ही अशी नावं, अगदी गजाननराव वाटवेंचं आमच्या कानामनात असलेलं सुगमसंगीत. आमच्या पिढीने जपलेली ही ‘आपली आवड’ अत्तरासारखी हवेत उडून जाते, गायब होते हे सांस्कृतिकदृष्ट्या चांगलं लक्षण नक्कीच नव्हे!

नोकरीत ‘पाट्या टाकणारा’ एकजण मला म्हणाला, ‘‘शाळा सुटली, पाटी फुटली... आता कोण ऐकणार? पाटी आहेच कुठे?’’ पण मंडळी ‘दे ना लवकर, भूक लागली’ आजही आहे. माणसांची, अगदी कोवळ्या लेकरांची भूक नको त्या गोष्टींसाठी वाढत गेली तर मग घरगुती, सात्त्विक ते नकोसं होतं.

तुम्ही सकळजन श्रद्धाळू आहात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा तुम्हाला कालबाह्य कसं वाटेल? इम्पॉसिबल. माणिक वर्मा किंवा ज्योत्स्ना भोळेंसारखी सुगम संगीत क्षेत्रातील रत्नं आणि त्यांना ध्वनिमुद्रित करणारे रत्नपारखी हा केवळ स्मरणरंजनात्मक इतिहास का ठरावा?

अगदी फू बाई फू, फुगडी फूसारखं विठ्ठल उमप यांनी रंगतदार बनवलेलं लोकगीत आजही माझ्या कॉलेज विद्यार्थ्यांना ताल धरायला लावतं.

हिल, हिल पोरी हिला हे ‘एकटा जीव’ असलेल्या दादा कोंडकेंच्या काळातलं मजेदार चित्रगीतही पोट्टयांना पसंत आहे. ‘गदिमां’च्या लेखणीचा परीसस्पर्श झालेलं गीतरामायण काव्यातून सुरेल कथा कशी सांगावी याचा वेगळ्या अर्थाने ‘पूजापाठ’च नवोदित गायक आणि उदयोन्मुख गीतकारांसमोरही मांडते.

मी तर, दादा कोंडकेंचं आत्मकथनही वर्गात ‘सिनेमा’ शिकवताना मास मीडियाच्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेतलं होतं. म्हणजे वाचायला दिलं. ‘लखलख चंदेरी’ प्रभात गीतंसुद्धा ‘कान’ असलेल्या संगीतप्रेमींना कधीही आऊटडेटेड वगैरे वाटणार नाहीत.

‘‘अरे चंदू,आज पु.लं.च्या आवाजातलं बाई या पावसानं गाणं पुणे केंद्रावर लागलं होतं’’, हे मी पार्ले कॉलेजमध्ये शिकत असताना वर्गमित्राला उत्तेजित स्वरात सांगायचो. ‘कॉलेज लेव्हल’ वगैरे म्हणत असाल, तर ती उंचावण्यासाठी संगीत कला नक्कीच उपयोगी पडते.

‘सोलो’ म्हणून समजा तुम्ही सरस नसाल, फक्त कोरस असाल तरी आनंद आहेच की! रशियन आणि जपानी लोक आपली जुनी गाणी जपतही असतील. पण आपली गाणी मात्र आपणच जतन करायची आहेत. मनातला संग्रहही महत्त्वाचा! आशा भोसलेंनी -तुमचा शब्द वापरायचा तर- या ‘फिल्ड’वर जे चंदन उगाळलं, त्याला तोडच नाही.

चांद मोहरे, चांदणे झरे आठवतंय का? विसरशील खास मला... असं त्या गाण्यातून म्हणाल्या, तरी उत्तम गाणी विसरून कसं चालेल राव? गाण्याच्या भेंड्या मग कशा खेळणार वहिनी तरी?

मला जाऊ द्या ना घरी... ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. पण तत्त्वज्ञानाचा स्पर्श झालेली जग हे बंदिशाळासारखी अर्थवाही गाणी आमच्याप्रमाणे तुमचीही तोंडपाठ असायला हरकत ती काय?... बालिशपणातही कधी कधी मजा असते.

केशवा माधवा (सुमन कल्याणपूर) मला आवडायचं ते त्यात ‘माधवा’ शब्द आहे म्हणून! जरी मी निरीश्वरवादी असलो; तरी ‘मंगल प्रभात’मधील आनंद मी पुरेपूर अनुभवला. पहाट ही कर्कश असूच नये. ग्रामीण भागात अप्रतिम आवाज लाभलेली पाखरं लेकरं आहेत. त्यांना प्रसिद्धीची सिद्धी कितपत लाभते? ती ‘रत्नागिरी आकाशवाणी’ आम्हा अभ्यासकांपर्यंत कधी आल्याचं मला तरी आठवत नाही.

असो. तर, काय सांगत होतो, तुमच्या नातवंडांपर्यंत छान छान छान मनी माऊचं बाळ कसं गोरं गोरं पानसारखी बालगीतं (कवी आणि मुख्य गायक -शरद मुठे) तुम्ही नेली, तर ही बाळगोपाळ मंडळी नक्कीच ‘एंजॉय’ करतील. दसरा-दिवाळीला तसा निग्रह करा, हा माझा विनम्र आग्रह आहे.

लताबाईंच्या अमर आवाजातलं प्रेमस्वरूप आई ऐकताना ज्याचं हृदय हेलावत नाही, त्याला रसिक सोडाच, मनुष्य तरी कसं म्हणावं?

आवडत्या कलावंताशी रसिकाने प्रसंगी संवादही अवश्य साधावा. अरुण दाते दापोली जवळच्या मुरूडला (महर्षी कर्वेंचं मुरूड गाव) पर्यटक म्हणून आले होते. वार्ताहर या नात्याने मी लगेच धाव घेतली. तासभर त्यांच्याशी माझा जो सुसंवाद झाला, तो मात्र संगीत रसिक म्हणून!

गायकांच्या बाबतीतही ‘ते कुठे... आपण कुठे...’ असा न्यूनगंड नसावा. ते आपले आहेत, आपण त्यांचे! जगाला प्रेम अर्पावे असं ‘गुरुजी’ सांगतातच, पण आधी आपल्या भाषेवर, मराठी कलेवर तर प्रेम करूया!

नाट्यगीत गायला कठीण असं अनेकांना वाटतं. घेई छंद मकरंद (वसंतराव देशपांडे) सगळ्यांना झेपेल असं नाही, पण तू तर चाफेकळीमधील (आशालता वाबगावकर) ‘नाट्य’ का नाही पेलणार? गाणं गुणगुणत श्रम हलके करणं हा तर गृहिणीचा जन्मसिद्ध हक्क आहे.

मग तुमची लाडकी पिंकी तुम्हाला हसत विचारते, ‘‘मम्मी हे कुठलं गाणं काढलंस गं? पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे...’’ पिंकीला तुम्ही घरात हसरे तारे म्हणून दाखवलं, तर ती काही नाक मुरडणार नाही.

अगदी एखाद्या आजीबाईने माझा होशील का? म्हटलं तरी नातू पप्या विचारेल, ‘‘आजोबा तुला बघायला आले, तेव्हा हेच साँग म्हटलं होतंस का?’’ पप्याचं ‘साँग’ म्हणजे गर्लफ्रेंड त्याला भेटायला येते तेव्हा तिच्या मनात हे गाणं नसलं तरी ‘माझा होशील का?’ हीच भावना असते ना? झालं तर मग! भावनेला भावगीताचे पंख फुटायला किती वेळ?

वसंत देसाईंनी तर पाठ्यपुस्तकांतील कवितांना चाली बांधून सोपी, गोड गाणी ध्वनिमुद्रिकांवर उपलब्ध करून दिली होती. आठवतंय का? जुन्या गाण्यांचं सामर्थ्य असं की त्यातलं काव्य ‘उरकलेलं’ नाही.

उंच पुकारील मोर काननी, निळ्या ढगांतून भरेल पाणी आपल्या नजरेसमोर ते स्वरचित्र साकार करतं. मग शांता शेळकेंची गाणी ऐकताना, मंगेश पाडगावकरांची आठवण काढताना आपणच हळूच ‘हृदयनाथ’ होऊ लागतो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT