genome sequencing
genome sequencing  esakal
साप्ताहिक

Human Genome :माणसातील या जनुकामुळे भाषेचा वापर करणे शक्य झाले..

सकाळ डिजिटल टीम

निएनडेर्थलच्या जनुकसंचयांपैकी इतरही काही जनुकं आधुनिक मानवाच्या अंगी असल्याचेही पुरावे आता मिळत आहेत. त्यापैकीच एक FOXP2 या नावानं ओळखलं जाणारं जनुक आहे.

त्याचा संबंध माणसाच्या भाषेच्या वापराशी आहे. भाषेचा उगम झाल्यानंतर आधुनिक मानवाचा विकास झपाट्यानं झाला यात शंका नाही.

डॉ. बाळ फोंडके

डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आधुनिक मानवप्राण्याचा, होमो सेपियनचा, उदय चिम्पान्झीसारख्या वानरांपासून झाला आहे. चिम्पान्झी हे मानवाचे उत्क्रांतीच्या प्रवाहातले पूर्वज होते. पण या विधानाचा सर्वसामान्यपणे चुकीचा अर्थ लावला जातो.

म्हणजे वानरांच्या एका दंपतीच्या संततीपैकी एक किंवा अधिक मानव झाले, असा समज प्रसृत केला जातो. तो चुकीचा आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहाची गती मंद आहे. हजारो, लाखो वर्षांच्या कालावधीत अंगभूत गुणधर्मांमध्ये बदल होत होत नव्या प्रजातीचा जन्म होतो. एका पिढीत तो होत नाही.

मानवाच्या उदयाबाबतीतही अशीच प्रक्रिया झाली आहे. वानरांपासून मानवापर्यंतच्या उत्क्रांतीच्या प्रवासात ऑस्ट्रॅलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निएनडेर्थलेन्सिस यांसारख्या अनेक प्रजाती उदयाला आल्या.

काही काळ तगल्या. तत्कालीन पर्यावरणाशी जुळवून न घेता आल्यामुळं नष्ट झाल्या. त्या पर्यावरणाशी सुसंगत असे गुणधर्म, त्यांना कारक असणारा जनुकीय वारसा ज्यांच्या अंगी होता त्या प्रजाती वाढल्या, फोफावल्या. कालांतरानं त्याही नाश पावल्या. नवीन प्रजातीचा अंमल सुरू झाला.

होमो सेपियन ही आधुनिक मानवाची प्रजाती साधारण दीड लाख वर्षांपूर्वी उदयाला आली, असंच आजवरचं संशोधन सांगत आहे. त्यापूर्वीच्या होमो कुळातल्या प्रजातींपैकी निएनडेर्थल मानवच त्यावेळी अस्तित्वात होता.

ती प्रजाती आणि होमो सेपियन एकसाथ काही काळ नांदले. पण त्यापैकी आपण म्हणजे होमो सेपियनच आजवर टिकून राहिले आहेत.

तरीही निएनडेर्थलच्या साथीनं होमो सेपियनची वाढ होताना त्यांच्यामध्ये काही संकर झाला होता की काय, याचं निःसंदिग्ध उत्तर मिळालेलं नाही.

पण जनुकीय वारशाच्या तपासणीतून निएनडेर्थलच्या अंगी असलेल्या काही जनुकांचा वारसा आपल्यालाही मिळालेला आहे, असं आढळून आलेलं आहे. त्यापैकीच SCN9A या जनुकाचे काही अवतार मानवामध्ये सापडले आहेत.

फ्रान्समधील वैज्ञानिकांनी युरोपीय वंशाच्या सात हजार व्यक्तींच्या जनुकीय वारशाचा धांडोळा घेतला. तेव्हा त्यांना त्यांच्या जनुकसंचयात या जनुकाच्या तीन निरनिराळ्या अवतारांचा समावेश असल्याचा पुरावा मिळाला.

त्याचा कोणता दृश्य परिणाम होतो याचा मागोवा घेतल्यानंतर त्यापायी त्या व्यक्तींच्या वेदना सहन करण्याच्या संवेदनेत घट होत असल्याचं दिसून आलं. त्या तीनपैकी कोणताही एक अवतार जरी अंगी असला, तरी त्यांना वेदना चटकन जाणवतात.

आपण राणा संग यांची हकिगत वाचलेली असते. अंगावर असंख्य जीवघेण्या जखमा झाल्यानंतरही ते लढतच राहिले, असं इतिहास सांगतो. त्या जखमांच्या तीव्र वेदना निश्चितच होत असणार, पण त्यांच्या संवेदना बोथट झाल्यासारखी राणा संग यांची वागणूक होती.

उलट साधी इंजेक्शनची सुई टोचली तरी ती सहन न होऊन आकाशपाताळ एक करणाऱ्या व्यक्तीही आढळतात.

हा फरकही या निएनडेर्थल जनुकाची करामत असल्याचं दिसून आलं आहे. त्याची पुष्टी दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, पेरू, चिली, कोलंबिया या देशातील सहा हजार व्यक्तींच्या जनुकांच्या तपासणीतून मिळाली आहे.

खास करून तिथले आदिवासी ज्यांचे पूर्वज होते अशा व्यक्तींच्या शरीरात या जनुकाचे अवतार प्रामुख्यानं आढळत असल्याचं दिसलं आहे. चिली देशात आदिवासी अमेरिकनांच्या वंशजांचं प्रमाण सर्वाधिक होतं.

त्यांच्यापैकी बहुसंख्याकांमध्ये हा निएनडेर्थलचा वारसा अस्तित्वात असल्याचं दिसलं. उलटपक्षी जिथं असे वंशज कमी प्रमाणात होते त्या ब्राझीलमध्ये हा वारसाही अभावानंच असल्याचं आढळलं.

याची चाचणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी लोकांच्या हातावर मोहरीचं तेल चोपडलं. त्याचा परिणाम त्वचेची जळजळ होण्यात होतो. त्यानंतर त्यांनी प्लॅस्टिकचे तुकडे त्याच जागी घासले. त्या तुकड्यांचं क्षेत्रफळही निरनिराळं होतं.

ज्यांना लहानातल्या लहान तुकड्यांच्या घासण्यापायी वेदना जाणवल्या त्यांच्या अंगी हा वारसा होता हेही स्पष्ट झालं.

उलट ज्यांच्या अंगी तो वारसा नव्हता त्यांना मोठ्यात मोठा तुकडा घासल्यावरच काही प्रमाणात वेदना जाणवल्या. साहजिकच त्यांची वेदनासंवेदनशीलता फारच कमी होती याचं प्रमाण मिळालं.

त्यातही एक निरीक्षण गंमतशीर होतं. उष्णता किंवा थंडी यांच्यापायी कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. तसंच कोणत्याही प्रकारचा दाब पडल्यापायीही वेदना होत नव्हत्या. केवळ सुईसारखा पदार्थ टोचण्यापायीच या वेदना जाणवत होत्या. वेदनांच्या आविष्कारातही फरक असल्याचं सिद्ध झालं होतं.

हे नेमकं कसं होतं? याचाही छडा या वैज्ञानिकांनी लावला आहे. हे जनुक एका विशिष्ट प्रथिनाची बांधणी करतं. ते प्रथिन आपल्या पेशींमध्ये सोडियमची आयात निर्यात करण्याचा कामात सक्रिय असतं. त्यापायी वेदनेची जाणीव करून देणारे मज्जातंतू चाळवले जातात.

ते तातडीनं तो संदेश मेंदूच्या त्यासंबंधीच्या केंद्राकडे पाठवतात. ते जनुक जर अंगी नसेल तर त्या प्रथिनाचं उत्पादन होत नाही. परिणामी वेदना संवेदक मज्जातंतू सुप्तावस्थेतच राहतात. मेंदूकडे त्यांचा संदेश पोहोचतच नाही.

निएनडेर्थलच्या जनुकसंचयांपैकी इतरही काही जनुकं आधुनिक मानवाच्या अंगी असल्याचेही पुरावे आता मिळत आहेत. त्यापैकीच एक FOXP2 या नावानं ओळखलं जाणारं जनुक आहे. त्याचा संबंध माणसाच्या भाषेच्या वापराशी आहे.

भाषेचा उगम झाल्यानंतर आधुनिक मानवाचा विकास झपाट्यानं झाला यात शंका नाही. भाषेच्या वापरासाठी स्वरयंत्रात पर्याप्त बदल होण्याची आवश्यकता होती. उत्क्रांतीच्या प्रवाहात तो गुणधर्म मानवाच्या अंगी अवतरला.

पण त्याचं कारक असणारं जनुक निएनडेर्थल मानवांमध्येही होतं. याचाच अर्थ ती प्रजातीही भाषेचा वापर करत होती. तोच वारसा मग आधुनिक मानवाला मिळाला.

असंच आणखी एक जनुक. त्याला व्हायकिंग डिसीज असं म्हटलं गेलं आहे, त्या व्याधीच्या उपसर्गाला ते कारणीभूत असतं. या व्याधीपायी हाताची बोटं वाकडी होतात. जणू ती त्याच अवस्थेत थिजून जातात. साहजिकच हाताच्या उपयोगात, खास करून कोणत्याही वस्तूवर पकड बसवण्यात, अडथळा निर्माण होतो.

मानवानं शस्त्र निर्माण करण्याचं तंत्रज्ञान अंगिकारल्यानंतरच त्याला प्राण्यांच्या इतर प्रजातींवर प्रभुत्व मिळवता आलं. पण या विचित्र व्याधीपायी शस्त्र हाती धरणंच अवघड होऊन बसतं. साहजिकच त्यानं ग्रस्त झालेल्या व्यक्तींना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हाताचा वापर करणं कठीण होऊन बसतं.

एवढंच काय पण झाडावरची फळं किंवा कंदमुळं वेचणंही सोपं राहत नाही. नॉर्वे आणि त्याच्या परिसरातल्या देशांमध्ये एकेकाळी राज्य करणाऱ्या व्हायकिंग जमातीत या व्याधीचा प्रसार झाला होता. त्याचा कार्यकारणभाव कळत नव्हता.

पण आता त्याला हा निएनडर्थलकडून मिळालेला जनुकीय वारसा कारणीभूत असल्याचा शोध लागला आहे.

आजवर या वारशांचा छडा लागला असला, तरी हा वारसा त्यांच्यापुरताच मर्यादित नसावा, असा विचार आता मूळ धरू लागला आहे.

आणखीही काही जनुकांची उत्पत्ती शोधण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांनाही यश येईल अशी आशा वैज्ञानिक बाळगून आहेत.

ते मिळो न मिळो, एक बाब स्पष्ट झाली आहे. अशा प्रकारे वारशाचा लाभ व्हायचा तर निएनडेर्थल आणि होमो सेपियन या दोन प्रजातींमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असणार यात शंका राहिली नाही.

त्यांचा संकर झाल्यामुळेच हा वारसा मिळालेला आहे. तरीही वेगवेगळ्या प्रजातींमध्ये संकर झाल्यानंतर जन्माला येणारी संतती वांझ असते, पुढच्या पिढीला जन्म देण्यास असमर्थ असते, असं प्राण्यांच्या इतर प्रजातींवरच्या संशोधनातून दिसून आलं आहे.

ते तत्त्व निएनडेर्थल आणि आधुनिक मानव यांच्या संकरालाही लागू पडतं यात शंका नाही. त्यामुळंच सरसकट सर्वांच्याच अंगी हा वारसा सापडत नाही.

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT