पुणे : अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून येत्या सोमवारपासून (ता.२) या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. या ऑनलाइन वर्गासाठी रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कला शाखेसाठी सहा हजार ८६४ विद्यार्थ्यांनी, तर वाणिज्य शाखेसाठी १८ हजार ३११ आणि विज्ञान शाखेसाठी ३५ हजार १८५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे.
सध्या मराठा आरक्षणामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेतलेले आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल झाले होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. अकरावीच्या ऑनलाइन वर्गांसाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना "https://covid19.scertmaha.ac.in/eleventh" येथे नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात हजेरी लावता येणार आहे, अशी माहिती राज्य परिषदेने दिली आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी गूगल क्लासरूम, झूम आणि यु-ट्यूब लाइव या माध्यमातून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी या कालावधीत विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ऑनलाइन तासिकांचा लाभ घेता येणार असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.
अकरावीच्या ऑनलाइन वर्गासाठी (क्लासेस) नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची काही जिल्ह्यामधील आकडेवारी :
जिल्हा | कला | वाणिज्य | विज्ञान | एकूण |
पुणे | ७२० | ३,५३५ | ५,२५६ | ९,५११ |
मुंबई | १,२७४ | ५,२१७ | २,९८४ | ९,४७५ |
नागपूर | १७१ | २५७ | ९६२ | १,३९० |
नाशिक | ४७२ | ७८७ | २,३५९ | ३,६१८ |
ठाणे | ६९० | २,७३६ | २,३७२ | ५,७९८ |
नगर | ३३२ | ५०० | २,२०२ | ३,०३४ |
सोलापूर | १६४ | २२७ | १,२२८ | १,६१९ |
कोल्हापूर | १८६ | ४८० | १,०८६ | १,७५२ |
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.