पुणे - लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे केलेले सुशोभीकरण मध्य रेल्वे प्रशासनाच्या अंगलट येऊ लागले आहे. अवघ्या एका महिन्यातच प्रवाशांनी सुमारे 15 लाखांच्या वस्तू रेल्वे गाडीतून चोरून नेल्या आहेत. सुमारे दोन हजार आरसे, 500 लिक्विड सोपच्या बाटल्या आदींचा त्यात समावेश आहे.
मध्य रेल्वेने गेल्या दोन वर्षांत लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण केले आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना उपयुक्त ठरतील असे एलईडी बल्ब, फेशनर, स्वच्छतागृहात दर्जेदार नळ, हॅंडल्स अशी आधुनिक साधने वापरली जात आहेत. सुमारे 300 गाड्यांच्या सुशोभीकरणावर रेल्वेने 400 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, अवघ्या एक महिन्यातच अनेक गाड्यांतील आरसे, लिक्विड सोपच्या बाटल्या तसेच स्वच्छतागृहांतील स्टीलचे सुमारे 3 हजार नळ आदी वस्तू चोरीस गेल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
ते म्हणाले, ""प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु, चोरीच्या अशा घटनांची लाज वाटते अन् वाईटही वाटते.''
रेल्वेतील बेडशीट, ब्लॅंकेट, उशा, रुमालही चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सुशोभीकरण करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांतील स्वच्छतागृहांतील स्टीलचे नळ मोठ्या संख्येने चोरीस जात आहेत. एका नळाची किंमत सुमारे 400 ते 500 रुपये आहे. परंतु, तेच मोठ्या संख्यने चोरीस जात असल्यामुळे आता त्या जागी प्लॅस्टिकचे सुमारे 60 रुपये किमतीचे नळ बसविण्यात येत आहेत. सुशोभीकरण पूर्ण झाल्यावर अशा वस्तू चोरीस गेल्या तर पुन्हा त्या वस्तू बसविण्यासाठी खर्चही जास्त येतो अन् मुख्य म्हणजे वेळ वाया जातो, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई विभागात 4 लाख 35 हजारांच्या, नागपूर विभागात 3 लाख 45 हजारांच्या, पुणे विभागात 3 लाख 25 हजारांच्या, सोलापूर विभागात 2 लाख 50 हजारांच्या, भुसावळ विभागात 1 लाख 70 हजार रुपयांच्या वस्तूंची एका महिन्यात चोरी झाली आहे. वस्तू चोरताना कोणता प्रवासी आढळल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
- ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.