पुणे, - पुणे शहरातील पीएमपी बससेवा या महिन्यात तरी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ती ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते, असे पीएमपीतर्फे गुरुवारी (ता. 2) स्पष्ट करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशावरच ते अवलंबून असले तरी, बस सुरू करण्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
कोरोनामुळे पीएमपीची शहरातील बससेवा 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील सेवाही तेव्हापासून बंद होती. मात्र, राज्य सरकारने पिंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळल्यानंतर 26 मेपासून तेथील सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पुण्यातील सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ती सुरू करावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक व नगरसेवक शंकर पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. शहरात रिक्षा वाहतूक सुरू आहे, मग पीएमपी का बंद ठेवली जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केली होता. मात्र, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी गुरुवारी आगार प्रमुखांची बैठक घेतली. त्यात याबाबत चर्चा झाली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तीस मार्गांचे नियोजन
शहरात सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू आहे. शासकीय कार्यालयांतील उपस्थिती वाढू लागल्याने आता या बसला गर्दी होत आहे. त्यामुळे सध्या 100 ऐवजी आणखी किमान 20 बस गरजेनुसार वाढविण्याचा निर्णय झाला. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये 80 बसची सेवा सुरू आहे. तेथेही प्रवाशांची गर्दी वाढली तर, बस संख्या वाढविण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेने परवानगी दिली तर, शहरातील वाहतूक किमान 30 मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. शहरातील ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहे, तेथे बससेवा नसेल. मात्र, अन्य भागात वाहतूक होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सूचना दिल्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पिंपरीत अल्प प्रतिसाद
पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रवासी सेवेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. बसमध्ये प्रवासी घेताना क्षमतेच्या निम्मेच प्रवासी सध्या घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्यासाठी परवानगी दिली जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.