मार्केट यार्ड, ता. १ : ‘‘अजित पवार हे शिस्तप्रिय, कामाचा उरक असणारे आणि स्पष्टवक्ते नेते होते. ग्रामीण कार्यकर्त्यांना समजून घेऊन त्यांना समवेत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका ठळक होती. त्यांच्या जाण्याने ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या आचार-विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’’ अशी भावना कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे सभापती प्रकाश जगताप यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांच्या निधनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल व कामगार या सर्व बाजार घटकांच्या वतीने रविवारी मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभापती प्रकाश जगताप यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या प्रतिमेसमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
शोकसभेत उपसभापती शशिकांत गायकवाड, बँकेचे संचालक विकास दांगट, संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, गणेश घुले, संतोष नांगरे, अनिरुद्ध (बापू) भोसले, संचालिका मनीषा हरपळे, सारिका हरगुडे, संस्थेचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, सुनील शेवाळे, विलास भुजबळ, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, नगरसेवक गौरव घुले, हनुमंत बहिरट, मधुकांत गरड आदींनी मनोगत व्यक्त करून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
या वेळी उपस्थितांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. शेतकरी, व्यापारी आणि कामगार हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
सचिव डॉ. धोंडकर म्हणाले, ‘‘अजित पवारांच्या विचाराप्रमाणे शिस्त, स्वच्छता, दर्जेदार काम करत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’
दरम्यान, पुण्याच्या वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून स्वर्गीय अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या रिंग रोडला त्यांच्या नावाने नामकरण करावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांनी यावेळी केली.
-------
मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजार घटकांकडून शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.