‘सकाळी झोपेतून उठलो... जिम केली... नाश्ता करून कंपनीत गेलो तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पण, दुपारी अंग दुखायला लागलं.
पुणे - ‘सकाळी झोपेतून उठलो... जिम केली... नाश्ता करून कंपनीत गेलो तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पण, दुपारी अंग दुखायला लागलं. अशक्तपणा जाणवू लागला. मगं जोरदार थंडी वाजून आली. ताप वाढू लागला...’ माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता शशांक शेंडे हे डेंगीच्या तापाचा आपला अनुभव सांगत होते.
‘सकाळपर्यंत काहीच नव्हते आणि संध्याकाळपर्यंत अंग तापाने फणफणले होते. कंपनीतून दुपारी थेट डॉक्टरांकडे गेलो. रक्ताच्या चाचण्या केल्या त्यात डेंगी झाल्याचे निदान झाले. त्यानंतर चार दिवस ताप कमी जास्त होत होता. वयाच्या चाळिशीपर्यंत कधीच डेंगी झाला नव्हता. आता प्रथमच तो अनुभवला,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
डासांची उत्पत्ती
एडिस इजिप्टाय या डासाची उत्पत्ती घर किंवा कार्यालयाच्या परिसरात पडलेल्या भंगार, टायर, फुटक्या बाटल्या यात साचलेल्या स्वच्छ पाण्यावर होतो. तसेच, घरातील फुलदाणी, टाक्या येथे होण्याची शक्यता असते.
लक्षणे कधी दिसतात
डेंगीचा डास चावल्यानंतर लगेच ताप येत नाही. डास चावल्यानंतर ५ ते ६ दिवसांचा अधिशयन काळ आहे. या काळात रुग्णाला लक्षणे दिसतात.
डेंगीची सुरुवात
जगामध्ये डेंगीचा उद्रेक गेल्या तीन शतकापासून सुरू आहे. विशेषतः शितोष्ण, समशीतोष्ण व उष्ण कटिबंधात तो आढळतो. डेंगीचा पहिला उद्रेक १६३५ मध्ये वेस्ट इंडीजमध्ये आढळला. डेंगी ताप व एडिस इजिप्टाय डास प्रामुख्याने जगातील शीतोष्ण कटिबंधात पसरलेला आहे. सध्या २५ दशलक्ष लोक डेंगी संवेदनशील भागात वास्तव्य करतात.
आजार होण्याची शक्यता कोणाला?
1) कामाच्या निमित्ताने सातत्याने घराबाहेर पडणाऱ्या २५ ते ५४ वर्षे वयोगटातील नागरिकांना डेंगीचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कारण, डेंगीचा संसर्ग वाढविणारा एडिस एजिप्टाय हा डास दिवसा चावतो. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्यांना डेंगी होण्याची शक्यता जास्त असते.
2) पुण्यात या वर्षी १ जानेवारी ते २६ जुलै यादरम्यान २५ ते ५४ वर्षे या वयोगटात ९१ (४६ टक्के) जणांना डेंगीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.
3) त्यात पुरुष रुग्णांची संख्या ५७ आणि महिलांची संख्या ३४ असल्याची नोंद महापालिकेत झाली.
...अशी घ्या काळजी
आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे.
घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
घरांच्या भोवताली व छतावर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये.
डेंगीचा संसर्ग पसरविणारा डास अर्ध्या किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे घरापेक्षा बाहेर असणाऱ्या रुग्णांना डेंगीचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यातही महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त दिसते,
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.