माळेगाव, ता. १७ : बारामती- माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषिक २०२६ प्रदर्शन म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य आकर्षण झाले आहे. नव्या संस्कृतीची, कृषी क्रांतीची दिशा शोधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ‘कृषिक’मध्ये अनेक शेतकरी सहभागी झाल्याचे दिसले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांबरोबर शेतीतज्ज्ञांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
शेती प्रात्याक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून एआय तंत्रज्ञानाच्या आधारे घेतलेली ऊस, केळीसह विविध पिकांपर्यंत बारामती कृषी विज्ञान केंद्रातील ‘कृषिक’ने आज पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांची गर्दी खेचली. आधुनिक अवजारे व मशनरी, तसेच पीक प्रात्याक्षिकांबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीचे यंदाचे कृषी प्रदर्शन खरेतर देशभर दाखविण्याची गरज बनली आहे. महाराष्ट्रासह देशात बहुमतांशी वेळा कृषी प्रदर्शन स्टॉल, कागदावर आणि भित्तीपत्रकाद्वारे पाहवयास मिळतात. परंतु, बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे आदर्श धडे थेट शिवारात पाहवयास मिळतात, असे मत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले. शेती विकासाचे ज्ञान देशभर पसरविण्यासाठी बारामतीचे कृषिक प्रदर्शन उपयुक्त आहे. या शेतकरी हिताच्या गोष्टी पाहण्यासाठी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बारामतीला आलो आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
शेतीमध्ये आगामी काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढविण्यावर भर राहणार आहे. एकरी दीडशे टन ऊस उत्पादन, ड्रोन तंत्रज्ञान, मिनी रोबो ट्रॅक्टर ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यासाठी या आधुनिक टॅक्नॉलॉजीला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनस्तरावर प्रयत्न आहे. अर्थात त्याचे उत्तम उदाहरण बारामती कृषी विज्ञान केंद्रातील प्रदर्शनातून शेतकऱ्यांना पाहवयास मिळत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.
यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, राजेश टोपे, हार्षवर्धन पाटील, सीईओ नीलेश नलावडे आदी उपस्थित होते.
१५० एकरात सर्वकाही
यंदाच्या ‘कृषिक’मध्ये १५० एकर क्षेत्रावर विविध प्रकारचे प्रयोगशील शेती प्लॉट, निर्णयातक्षम पालेभाज्या व फळबागा, मशागतीची अवजारे आधुनिक टेक्नॉलॉजीच्या आधारे तयार केलेल्या मशनरीपासून ते रोबोटिक तन नियंत्रण मशीनपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहवयास मिळत आहे. त्याबद्दल अहिल्यानगर, नाशिक आदी भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.