चाकण, ता. २० : येथील औद्योगिक वसाहत ही देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची औद्योगिक वसाहत मानली जाते. मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या, बहुराष्ट्रीय उद्योग आणि हजारो लघुउद्योग येथे कार्यरत आहेत. या औद्योगिक वसाहतीत भंगार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. कंपन्यांत भंगाराचा ठेका घेणे यातही मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे भंगार चोऱ्यातून कोणाचे उखळ पांढरे होते असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतील लोखंडी साहित्य, मशिनरी पार्टस, तांबे, अॅल्युमिनियम, केबल्स तसेच उत्पादनासाठी वापरण्यात येणारे महागडे धातू, कच्चा माल याची चोरी होऊन भंगार बाजारात विक्रीसाठी जात आहेत. त्यातून लाखो रुपये कमवणाऱ्या अनेक टोळ्या व सराईत गुन्हेगार आहेत.
कंपन्यांतील चोऱ्या किरकोळ स्वरूपाच्या नसून योजनाबद्ध आणि साखळी पद्धतीने होत आहे. सुरक्षा रक्षक, काही कामगार, अधिकारी, वाहतूकदार तसेच भंगार व्यावसायिक यांचे आर्थिक साटेलोटे असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या शक्य नसल्याचे बोलले जात आहे. काही कारखान्यांमध्ये महिन्याला लाखो रुपयांचे भंगार व इतर साहित्य गायब होत आहे. भंगार व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा आहे.
चोरीला गेलेले भंगार साहित्य, सुटे भाग भंगार दुकानात जाते. अनेक भंगार गोडाऊनमध्ये कोणतेही बिल, कागदपत्रे किंवा भंगार, माल कोठून आणला याची माहिती न देता विकला जातो. यामागे स्थानिक पातळीवर काहींचे ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय हा धंदा इतक्या निर्भयपणे सुरू राहू शकतो का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढत्या भंगार चोरांकडे , टोळ्यांकडे या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा डोळेझाक का करत आहे?, पोलिसांकडून काही वेळा कारवाई झालीच तर ती केवळ लहान चोरट्यांपुरती मर्यादित असते. मात्र या संपूर्ण साखळीचे सूत्रधार, बडे मासे, व्हाईट कॉलर, मदत करणारे काही पोलीस अधिकारी, कर्मचारी मात्र मोकाटच राहतात असे भयानक चित्र आहे.
या भंगार चोरीमुळे उद्योगांचे आर्थिक नुकसान होते. उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. काही उद्योगांना, कंपन्यांना चोऱ्या न होण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा खर्च वाढवावा लागतो. चाकण औद्योगिक वसाहतीतील भंगार चोरीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते का, असा प्रश्न उद्योजक, कामगारांमध्ये आहे.
पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही ठोस कारवाई होत नाही असेही आरोप आहेत. काही प्रकरणांत गुन्हे दाखल झाले असले तरी आरोपींना लवकर जामीन मिळतो त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढते. रात्रीच्या वेळी पोलिसांनी परिसरात गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
औद्योगिक वसाहतीत भंगार चोऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी ज्या तक्रारी पोलिस ठाण्यात येतात. त्या तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाते. गुन्हेगारही पकडले जातात. गुन्हेगारांवर सातत्याने कारवाई होते. भंगार चोऱ्या रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-दिगंबर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे उत्तर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.