पुणे : जागतिक स्वरूपाच्या कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने वैद्यकीय तज्ज्ञ, आजी-माजी लोकप्रतिनिधी, माजी अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सुजाण नागरिक यांची मदत, सहभाग घेणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. अखेर राजीव गांधी स्मारक समितीच्या पुढाकारातून नागरिकांनी एकत्र येत कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती आता कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
राजीव गांधी स्मारक समितीतर्फे याबाबतची ऑनलाइन बैठक काँग्रेसचे प्रवक्ते व राजीव गांधी स्मारकाचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. अनंत फडके, फत्तेचंद रांका, नगरसेवक रवींद्र माळवदकर, डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. जयश्री तोडकर, रुबीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय पठारे, दीनानाथ हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. अभिजीत मोरे, सहयाद्रीचे डॉ. सुनील राव, माजी आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. परदेशी उपस्थित होते. गोपाळ तिवारी यांनी सर्व चर्चेचे सूत्र संचालन केले.
महेश झगडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन ही प्रशासनाची जबाबदारी आहे, मात्र अशा मोठ्या आपत्तीमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो, मात्र पुणे महापालिकेने या आपत्तीमध्ये सुरुवातीपासून याकडे दुर्लक्ष केले. पुणे शहरात कुठलीही साथ सर्वात पहिल्यांदा येते हा इतिहास आहे. पुण्याच्या आरोग्य यंत्रणेकडे स्वाइन फ्ल्यू साथ नियंत्रणाचा सर्वात चांगला अनुभव होता. त्यामुळे खरे तर पुणे कोरोनाच्या साथीत सर्वात सेफ शहर ठरायला हवे होते, प्रत्यक्षात त्या उलट झाले. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. आम्हा नागरिकांचे सहकार्य घ्या, 15-20 दिवसात साथ आटोक्यात येईल.
शहराच्या प्रत्येक 10-15 हजार लोकसंख्येसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करायची. त्यासाठी अधिकारी, डॉक्टर व इतर यंत्रणा यांची समिती असावी. यामाध्यमातून सध्या चाललेल्या मिस मॅनेजमेंटला आळा घालता येऊ शकेल.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची दययनीय अव्यस्था झाली आहे, त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या महामारीने लोकांना केवळ मारले नाही तर आर्थिकदृष्ट्या विकलांग ही करून सोडले आहे. लोकसहभागातून सगळ्यांना सोबत घेऊन याचा यशस्वी मुकाबला करता येऊ शकेल असे झगडे यांनी सांगितले.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, एक चांगली चर्चा यानिमित्ताने घडून आली आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन कृतीगट स्थापन करावा. कृतीगटामार्फत एक ऍक्शन प्लॅन तयार करून त्याचा शासन पातळीवर पाठपुरावा करूयात. यामध्ये लोकसहभाग वाढवूयात.
तिवारी यांनी सांगितले, आजच्या चर्चेत माजी प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे, सूचना मांडल्या आहेत. ही सर्व माहिती एकत्र करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देणार आहोत. त्याचबरोबर नीलम ताई व इतर मान्यवर सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार कृतीगत तयार करून याचा पाठपुरावा करू.
रमेश बागवे म्हणाले, अनेक गोर-गरीब रुग्ण त्यांच्या अडचणी घेऊन आमच्याकडे येत आहेत. त्यासाठी रुग्णालयांशी संपर्क साधला असता अनेकदा प्रतिसाद दिला जात नाही. प्रत्येक रुग्णालयाने उपलब्ध बेड, सुविधा याची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी एक अधिकारी नेमावा. त्यामुळे धास्तावलेल्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही. आम्ही काँग्रेस पक्षाकडून कोरोनाबाबत रुग्ण व नातेवाईकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.
पी. ए. इनामदार यांनी नर्सेस, मेडिकल स्टाफ यांचा तुटवडा जाणवत असल्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा होत असल्याचे सांगितले.
डॉ. प्रसाद राजहंस यांनी दीनानाथ रुग्णालयाकडून कोरोनासाठी 400 बेड उपलब्ध करून दिले असून त्यामध्ये 40 बेड हे विथ आयसीयू असल्याचे सांगितले. रुग्णांचे एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतर टाळून आहे त्या ठिकाणी योग्य उपचार करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. अनंत फडके यांनी साथीचा वेग कमी करण्यावर प्रशासनाने सर्वाधिक भर देणे गरजेचे असल्याचे मत मांडले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये महापालिका कमी पडत आहे. सध्याची टीम थकली असून त्यांच्या मदतीला नव्या दमाची टीम देणे गरजेचे असल्याचे फडके यांनी सांगितले.
डॉ. आर. आर. परदेशी यांनी सांगितले, कोरोनाच्या साथीमध्ये आपण ज्या तीव्रतेने जागे व्हायला हवे होते, तितके झालो नाही. स्वाइन फ्ल्यूच्या साथीमध्ये यातुलनेत अधिक वेगाने काम होऊन साथ नियंत्रणात आली. त्याचप्रमाणे आता ही वेग वाढवावा लागेल. त्यासाठी सर्वतोपरी मदत करायला आम्ही तयार आहोत.
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, अम्ब्युलन्सचा तुटवडा जाणवतोय, रिक्षा ही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाने डॉक्टरांना विश्वासात घ्यावे. योग्य ती तपासणी न करता डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या. डॉक्टरांच्या समस्या प्रशासनाने जाणून घ्याव्यात. ज्येष्ठ डॉक्टर टेलिमेडिसन सुविधा देऊ शकतील त्यामुळे ताण कमी होऊ शकेल.
डॉ. सुनील राव यांनी रुग्णालयांना दररोज वेगवेगळ्या यंत्रणांना वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट दयावे लागत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या बैठकांना सतत उपस्थित रहावे लागत आहे, त्यामध्ये बराच वेळ जात असल्याकडे लक्ष वेधले.
डॉ. जयश्री तोडकर यांनी औषध तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे सांगितले. रुग्णांना मानसिक धीर देणे, जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फत्तेचंद रांका यांनी सुशिक्षित नागरिकांकडून अनेक नियमांचे पालन होत नसल्याकडे लक्ष वेधले. रवींद्र माळवदकर यांनी आभार मानले.
(Edited by : sagar diliprao shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.