पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने शहरातील सर्व दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढविण्याचा विचार आहे. यानुसार सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२४) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच कोरोना चाचण्या आणि सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज कराव्यात, असा आदेश पवार यांनी शहर व जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
पालकमंत्री पवार यांनी आज शहर व जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत दुकाने उघडण्याची वेळ वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींना दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
आजच्या कोरोना आढावा बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आणि शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यःस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्यूदर, ऑक्सिजन प्रकल्प याबाबतच्या सद्यःस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
सद्यःस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा अपवाद वगळता अन्य सर्व दुकाने हे सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी आहे. शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने पूर्णपणे बंद असतात. दुकाने उघडण्यासाठीची वेळ वाढविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी करत आहेत. या मागणीनुसार दुकानांची वेळ वाढविण्याचा विचार करत आहे.
विकेंड लॉकडाऊनचाही निर्णय होणार
दरम्यान, शहरातील दुकानांची वेळ वाढविण्याबरोबरच शहरात विकेंड लॉकडाऊन असावे की नसावे, याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच विकेंड लॉकडाऊन ठेवायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.