बारामती : अत्यावश्यक सेवा वगळता येत्या 30 एप्रिल पर्यंत बारामती शहर व तालुका बंद ठेवण्याचा आज निर्णय घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या बाबत माहिती दिली. राज्य शासन व जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार बारामतीतील अत्यावश्यक सेवेअंतर्गत असलेले भाग वगळून इतर सर्व दुकाने व आस्थापना येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
बारामतीत काल विक्रमी तपासण्या झाल्या. शासकीय व खाजगी मिळून 732 नमुने तपासले गेले. त्यापैकी 171 जण पॉझिटीव्ह आढळले. शहरातील रुग्णसंख्या सातत्याने शंभराच्या घरात राहत असल्याने चिंता अधिक आहे. बारामतीची रुग्णसंख्या झपाट्याने अकरा हजारांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आजपर्यंत 10454 जणांना कोरोना झाला असून त्या पैकी 8533 रुग्ण बरे झाले आहेत, 169 रुग्ण यात मृत्यूमुखी पडले.
दरम्यान, अचानकच आज सकाळी बाजारपेठ बंद ठेवण्याचा फतवा आल्यानंतर बारामती व्यापारी महासंघाने या निर्णयाला कडाडून विरोधकेला. तब्बल 25 दिवस दुकाने बंद ठेवणे आता व्यापा-यांना परवडणारे नसल्याची भावना व्यापा-यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या प्रसंगी नरेंद्र गुजराथी, नरेंद्र मोता, संदीप मुंबईकर, प्रमोद खटावकर, जगदीश पंजाबी, विवेक पांडकर, प्रवीण आहुजा, सुशील सोमाणी, संजय सोमाणी, चेतन व्होरा, परेश वीरकर आदी उपस्थित होते. कालपर्यंत व्यवहार सुरु असताना आज अचानकच सकाळी पोलिसांनी व्यापा-यांना दुकाने बंद करण्यास सांगितल्यानंतर व्यापारी संतप्त झाले होते.
पगारच करु शकणार नाही...
25 दिवस व्यवसाय बंद ठेवले तर कर्मचा-यांचे पगारच आम्ही करु शकणार नाही. मागच्या लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही सहकार्य केले, आता आमचीच आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने व आम्हाला कसलीही मदत झालेली नसल्याने आता हा भार उचलणे आम्हाला शक्य नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार मालाचे लिलाव सोमवारी व तेलबियांचे लिलाव मंगळवारी घ्यायचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जळोचीतील जनावरे बाजार बंद राहणार असल्याचे सभापती वसंतराव गावडे, उपसभापती दत्तात्रय सणस व सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, शारदा प्रांगणात लसीकरण सुरु झाल्यानंतर लसीकरण मोहिमेस बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मध्यवर्ती ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध झाल्याने बारामतीकरांनी या बाबत समाधान व्यक्त केले.
आर्थिक कंबरडे मोडून जाईल...एकीकडे जागाभाडे, वेतन, वीजबिल, कर्जाच्या व्याजाचे हप्ते यासह सर्व खर्च सुरु असताना दुसरीकडे व्यवसाय ठप्प असण्याने व्यापा-यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. आमच्या दुकानांवर प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या किमान 35 हजार जणांवर या लॉकडाऊनचा विपरीत परिणाम होणार आहे. –नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ.
दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पाठिंबा- शनिवार व रविवारी लॉकडाऊन घोषित केले, त्याला आमचा पाठिंबा होता, दुकाने सोडता वाहतूक, इतर सर्व बाबी सर्रास सुरु आहेत. बँकामध्ये मोठी गर्दी आहे, अशा स्थितीत व्यापार खंडीत करणे अर्थचक्राच्या दृष्टीनेही न परवडणारे आहे. सहकार्य करण्यास व्यापारी नेहमीच तयार असतो, मात्र आता व्यापारी तग धरु शकणार नाही अशी स्थिती आहे -सुशील सोमाणी, बारामती व्यापारी महासंघ.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.