water on road in pune sakal
पुणे

Pune News : गटारांनी पाडले पुणे महापालिकेला उघडे; अखेर सगळं पाण्यात

पुणे शहरात अर्धा, एक तास जरी मोठा पाऊस झाला की शहर तुंबते.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - शहरातील एकूण रस्ते १४०० किलोमीटरचे आणि पावसाळी वाहिन्यांची (गटारे) लांबी केवळ ३०० किलोमीटर अशी अवस्था आहे. नवीन रस्त्यांवर पावसाळी वाहिन्या टाकल्या जातात, मात्र जुन्या रस्त्यांकडे कोणीही बघत नाही. जेथे पावसाळी वाहिन्या आहेत, त्यांची व्यवस्थित साफसफाई होत नाही.

त्यामुळे शहरात अर्धा, एक तास जरी मोठा पाऊस झाला की शहर तुंबते. पुणे स्मार्ट सिटी असल्याचे बिरुद मिरवले जात असले तरी शहर ठप्प होण्यास अर्ध्या तासाचा पाऊस पुरेसा असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने चौकाचौकात, रस्त्यांवर पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. यामुळे वाहतुकीचा पुरता बट्ट्याबोळ उडाला. अशा वेळी महापालिकेची यंत्रणा तोडकी असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील ३०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची, चेंबरची स्वच्छता करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय तब्बल २२ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या.

संबंधित ठेकेदार एकदाच स्वच्छता करतात, त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. मलनिस्सारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालये यांच्यात समन्वय नसल्याने ही कामे व्यवस्थित होत नाहीत. ‘सकाळ’ने हा मुद्दा उपस्थित करून याकडे लक्ष वेधले होते.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कोथरूड येथे पाणी तुंबल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट लक्ष घालावे लागले. त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलाखाली, तर भयावह स्थिती निर्माण होत आहे. या पाण्यामुळे वडगाव स्मशानभूमी बंद पडत आहे. कर्वेनगर येथील स्मशानभूमीदेखील पाणी तुंबल्याने बंद पडली.

तरीही मलनिस्सारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाला स्मशानभूमीत जाणारे पाणी रोखता आलेले नाही. डहाणूकर कॉलनी येथील पादचारी भुयारी मार्ग पाण्यात बुडाला, खराडीत घरांमध्ये पाणी शिरले, अशा अनेक घटना घडल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही पितळ उघडले पडले आहे.

पुणेकरांचे नशीबच

शहरात काही काळ मुसळधार पाऊस पडला की रस्ते पाण्याखाली जातात. घरे, दुकाने, बंगल्यांमध्ये पाणी शिरत आहे. मात्र पाऊस लवकर थांबत असल्याने पुढील अनर्थ टळत आहे. एकाच वेळी संपूर्ण शहरात पाऊस होत नसल्याने पाणी तुंबण्याच्या घटना ठरावीक भागात घडत आहेत, हे पुणेकरांचे नशीबच म्हणावे अशी स्थिती आहे.

तरतूद केवळ १२ कोटी

महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी निधी नाही. २०२१ मध्ये पुण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यापैकी ४६ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. या कामासाठी २०२३-२४च्या अर्थसंकल्पात तरतूद केली. पण कोणतेही नवीन कामे सुचविण्यात आलेले नाहीत.

केंद्र सरकारने शहरातील पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी २५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. पण त्यात पावसाळी वाहिनी टाकण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने पाणी जमिनीत मुरविण्यावर भर देण्यात आला आहे.

मुंबईप्रमाणे हवा स्वतंत्र विभाग

मुंबई महापालिकेत पावसाळी वाहिन्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यासाठी मोठी तरतूददेखील उपलब्ध करून दिली जाते. पुण्यात पावसाळी वाहिनी हा दुर्लक्षित विषय आहे. अशी वाहिनी टाकायचे काम पथ विभाग करतो, तर त्याची देखभाल दुरुस्ती मलनिस्सारण विभाग करतो. त्यासाठी पुरेशी तरतूददेखील उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने या कामासाठी मुंबईप्रमाणे स्वतंत्र विभाग केला तर ही कामे व्यवस्थित होऊ शकतील.

कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यानंतर शहरात पाणी तुंबू नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळी गटारासाठी स्वतंत्र निधी नसला तरी महत्त्वाच्या कामांच्या निधीतून किंवा ६७, ३ क या नियमाखाली निधी उपलब्ध करून दिला जातो.

या वर्षी जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता, मंगलदास, साऊथ मेन कोरेगाव पार्क रस्ता येथे पाणी तुंबले नाही. समान पाणी पुरवठा योजना, मेट्रो, रस्ते यासह इतर कामांमुळे मुख्य रस्त्यांवरील पावसाळी वाहिन्या बुजल्या आहेत, त्यामुळे पाणी तुंबत असून दुरुस्ती सुरू आहे.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

अशी आहे स्थिती

  • रस्त्यांची एकूण लांबी - १४०० किलोमीटर

  • पावसाळी वाहिन्या - ३०० किलोमीटर

  • निविदांची रक्कम - २२ कोटी

  • पाणी साचण्याची ठिकाणे - ४६

  • केंद्राचा निधी - २५० कोटी

खडकवासला, नांदेड, धायरी

  • खडकवासला बसस्टॉप‌‌ आणि‌ पुणे पानशेत मुख्य रस्त्यावर कमी वेळेत जास्त पाऊस झाला की पाणी साचते.

  • शेतातून थेट रस्त्यावर आलेले येते.

  • जाधवनगर नांदेड‌मध्ये (कडबा कुट्टीजवळ) डोंगर उताराच्या बाजूने पावसाचे पाणी येते.

  • रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नाही.

  • पावसाळी वाहिनी टाकणे गरजेचे.

  • धायरीतील गणेश मंगल कार्यालयाजवळ खोलगट भाग आहे, त्यामुळे पाणीसाठा होतो.

  • रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी जाण्याची व्यवस्था नाही.

सातारा रस्ता, बिबवेवाडी परिसर

  • सातारा स्त्यावरील बीआरटी मार्गात अरण्येश्वर बसथांब्याशेजारी गतिरोधकामुळे पाण्याचा साठा

  • प्रवाशांना गतिरोधकावरून बीआरटी मार्ग ओलांडून बसथांब्यावर जावे लागते.

  • गतिरोधकालगत पावसाळी चेंबर केले तर पाण्याचा निचरा होईल.

  • पद्मावती पुलावर पाणी साठून राहते, पुलावरील डांबरीकरण केल्यामुळे बीआरटी मार्गाला खड्डा झाला आहे, त्यातच दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रीटची भिंत असल्यामुळे बीआरटी मार्गात पाणी साठून राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT