शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर परिसरातील गुन्हे दाखल झालेल्या 65 शेतकऱ्यांनी थेट पाटबंधारे खात्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात आपला मोर्चा वळविला असून, वेळेत पाणी न सोडल्याने 100 हेक्टरवरील जळालेल्या पिकांच्या नुकसानभरपाई पाटबंधारे खात्याने द्यावे, अशी मागणी थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
चासकमानचे पाणी वेळेत व नियमानुसार दिले नसल्याने शिक्रापूर परिसरातील दहा गावांतील सुमारे 100 हेक्टर क्षेत्रातील पिकाच्या नुकसानी झाल्या आहेत. यातील काही गावांमध्ये आता खासगी टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे. पर्यायाने केवळ पाणी आवर्तन नीट दिले न गेल्याने 100 हेक्टरवरील तरकारी, ऊस, नगदी पिकांची नुकसानभरपाई महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करून द्यावी, अशी मागणी जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रूक, करंदी, मुखई, पिंपळे-जगताप, वाजेवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, बुरुंजवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
चासकमान कालव्याचे पाणी सोडले म्हणून शिक्रापूर परिसरातील 65 शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळ्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत कायदेशीर लढाई सुरू असताना आज शेतकऱ्यांनी थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून "चासकमान'च्या आंदोलनासह एकूणच घटनाक्रमाची माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांची कशी दिशाभूल केली, हे सर्व पुराव्यांसह पाठविले आहे.
आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे असल्याचे सांगितले जात असताना शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच 65 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होत असतील; तर त्याचे आत्मचिंतन सरकारने करावे आणि ताबडतोब पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सूचना पोलिसांना द्यावी, अशी विनंतीही शेतकऱ्यांनी या पत्रात केली आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयाला मेलने पाठविले असून, सर्वांना ट्विटरद्वारे कळविल्याची माहिती शेतकऱ्यांचे वकील ऍड. दिग्विजय पलांडे यांनी दिली.
पाणी आवर्तन न मिळाल्यामुळे शेतीमालाचे नुकसानी झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या असल्या तरी यासंदर्भात खात्याचे वरिष्ठ अधिकारीच नेमकं काय ते बोलू शकतील. शिक्रापूर परिसराचे पाणी वितरण आणि त्या संबंधित सर्व प्रश्न याबाबत वरिष्ठ लक्ष ठेवून आहेत.
- एस. के. गायकवाड, शाखा अभियंता, शिक्रापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.