सासवड : कोरोना विषाणुचा संसर्ग दुसऱया लाटेत तीव्र स्वरुपात पसरत असताना व कम्युनिटी स्प्रेड झालेला असताना.. मंगल कार्यालयातील विवाहात 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी लोकं जमवून आदेशाचे व नियमांचे उल्लंघन केल्याने.. येथील तीन मंगल कार्यालयाच्या मालकांवर गुन्हा दाखल केला. शिवाय तिन्ही ठिकाणच्या विवाहांतील तीन वधू पित्यांवर व दोन वर पित्यांवर.. अशा एकुण आठ जणांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शिवाय पार्सल सुविधा असताना.. ग्राहकास टेबलवर अन्न-मद्य दिल्याबद्दल सासवड व परीसरातील तीन हाॅटेलवर कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी ही माहिती दिली. भारतीय साथीचा अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 नुसार व भादवि कलमानुसारही गुन्हा दाखल केला आहे. काळेवाडी (ता. पुरंदर) येथील सरस्वती मंगल कार्यालयाचे मालक रमाकांत बाळासाहेब काळे व तेथील वधू - वर पिता पांडुरंग दत्तात्रेय कोलते आणि शंकर वसंत बडदे यांनी विवाहात गर्दी जमवून कित्येकांना मास्कही नव्हते. शारीरीक अंतराचा तर फज्जाच उडाला होता. त्यातून या तिघांच्या विरुध्द पोलीस शिपाई सुरज चंद्रकांत नांगरे यांनी पुरावे म्हणून छायाचित्रे काढून स्वतः फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. याशिवाय काळेवाडीतीलच काळे लाॅन्समध्ये कोरोनाचे निर्बंध न पाळता विवाहात गर्दी जमविल्याबद्दल कार्यालय मालक संजय ज्ञानदेव काळे, वधू-वर पिता व्यंकट दिगंबर जाधव आणि सचिन काळूराम पठारे यांच्या गुन्हा दाखल झाला.
या शिवाय ढुमेवाडी येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय मालक दादासाहेब रामचंद्र पवार यांच्यासह गणेश नामदेव जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. काही दिवसांपूर्वीच सरस्वती कार्यालयावर आधीच एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय खळद ता. पुरंदर येथील मोहन फॅमिली गार्डन रेस्टॅरंट, सासवड (ता. पुरंदर) येथील उत्तम फॅमिली रेस्टाॅरंट आणि भिवरी (ता. पुरंदर) येथील हाॅटेल रुद्र गार्डन.. या तिन्हीविरुद्ध फक्त पार्सल सेवा असताना ग्राहकास बसवून अन्न व मद्य पुरविल्याबद्दल व कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. वरील गुन्ह्यात पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक निरीक्षक राहुल घुगे, महिला पोलीस उप निरीक्षक सुप्रिया दुरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लियाकतअली युनूस मुजावर, पोलीस हवालदार दत्तात्रेय माने, पोलीस शिपाई सुरज चंद्रकांत नागरे, पोलीस शिपाई महेश उगले आदींनी स्वतः फिर्यादी दिल्याने फिर्यादी अतिशय पक्क्या दाखल झाल्या आहेत.
गर्दीचे ठिकाण कळवा, बक्षिस मिळवा...कोरोना संसर्ग वाढीची अनेक कारणे आहेत. पैकी विवाह समारंभ व घरगुती धार्मिक कार्यक्रम ही सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे पोलीस पोचून कारवाई करतीलच. परंतु, जवळपासच्या नागरीकांनी समाजहितासाठी जागृत व्हावे व 50 पेक्षा अधिक लोक एकत्र दिसतील, ते ठिकाण कळवावे आणि नाव गुप्त राखत पोलीसांचे योग्य बक्षिस मिळवावे., असे जाहीर आवाहन जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी सासवड भेटीत नुकतेच केले होते. त्या पद्धतीने लोकांनी गर्दीची माहिती कळवून बक्षिस मिळवावे., असे पुन्हा एकवार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी आज सकाळ शी बोलताना सांगितले.
कुठल्याही विवाह समारंभात बंधने सोडून नियम तोडून गर्दी केली जात आहे. त्यामुळे दोनशेची मर्यादा..आता बंदिस्त मंगल कार्यालयात वधू व वराकडील मिळून 50 वर आणि खुल्या जागेत दोन्हीकडील मिळून 100 वर आणली आहे. त्यापेक्षा एक जरी नागरीक जास्त असेल तर वधू व वर पिता, मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक याच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश आहेत. प्रत्येक विवाहाचे फोटो, व्हिडीअो शुटींग, केटरींगची आॅर्डर तपासून नंतरही शंका वाटली तरी खटला दाखल करता येणार आहे. कार्यालयाच्या पहील्या कारवाईनंतर पुन्हा कारवाईची वेळ आली तर वर-वधू पित्यांवर खटला व मंगल कार्यालयाच्या मालकावरच गुन्हा दाखल करुन कार्यालयास टाळे ठोकण्याची पोलीस यंत्रणेस परवानगी मिळाली आहे.-अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, सासवड
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.