Ganesh festival
श्रद्धा कोळेकर
: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत एका १९ वर्षीय मुलाच्या डोळ्यांवर लेजर लाईट पडल्याने त्याने त्याची जवळपास ७० टक्के दृष्टी गमावली. तर अनेक ठिकाणी लेजर लाईटचा त्रास झाल्याने अनेकांना काही काळासाठी दिसत नसल्याच्या समस्या देखील झाल्या.
सांगलीतील तासगाव येथे शेखर पावशे नावाचा तरुण गणपतीत डीजेच्या आवाजाने त्रास झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर योगेश साखरे या पुण्यातील हिंजवडी येथील तरुणाचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाला. हे मृत्यू नेमके कशाने झाले याबाबत मतमतांतरे आहेत.
ही सर्व उदाहरणे काही मागील वर्षातील नाही तर याच वर्षीच्या गणेशोत्सवातील आहेत. त्यामुळे हा उत्सवाची दिशा भरकटली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
लेजर किरणांमुळे १९ वर्षीय तरुणाची दृष्टी कमजोर
सिंहगड रस्ता परिसरात राहणारा अनिकेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचत असताना डिजेवरील लेजर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला. यावेळी त्याला डोळ्याला काही वेदना किंवा आग झाली नाही परंतु, त्याची दृष्टी मात्र अंधुक झाली.
यानंतर अनिकेत नेत्र तपासणी साठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांच्या कडे गेला. त्यावेळी परीक्षणाअंती त्यांनी अनिकेतच्या डोळ्याला लेजरलाईट मुळे गंभीर इजा झाल्याचे संगितले.
त्याच्या डोळ्याच्या रेटीनावर परिणाम झाला असल्याचे सांगितले. परिणामी त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास ७० टक्क्याने कमी झाल्याचे अनिकेतचे म्हणणे आहे अशी माहिती डॉ. दूधभाते यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
काय आहे लेजर बर्न?
याबाबत डॉ.दूधभाते यांनी सांगितले होते की, या लेजर लाईटची क्षमता पाच मिलीवॅट पेक्षा जास्त असल्यास; ती १० सेकंद एवढ्या कालावधी साठी जरी बाधीत झाली तरी रेटीनास गंभीर इजा होवू शकते. जे युवक त्या लेजर वारंवारितेच्या (फ्रिक्वेन्सी) केंद्रास्थ लांबी वर ('फोकल लेंग्थ') आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले तर त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही डॉ. दूधभाते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
जास्त आवाजाची पातळी ही हानिकारक आहे हे विज्ञानाने सिद्ध
जास्त आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना आरोग्यसेना, राष्ट्रीय प्रमुख व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, मानवी आरोग्याला ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा जास्त आवाजाची पातळी ही हानिकारक आहे हे विज्ञानाने या आधीच सिद्ध केले आहे.
ध्वनी प्रदूषण ही संकल्पना देखील वैद्यक शास्त्राने स्पष्ट केली आहे. या तरुणांचा मृत्यू हा त्या आवाजाने झाला का, हे त्यांच्या शवविच्छेदनानेच कळेल. पण याचा अर्थ असा म्हणता येणार नाही की आवाजाने कोणताही त्रास होत नाही.
नवजात बालके, लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती, कमकुवत मनाच्या व्यक्ती, मानसिक आजरी व्यक्ती या सगळ्यांना या आवाजाचे त्रास झालेले आहेत. मी स्वतः लहानपणी या आवाजाने अभ्यास करू शकत नव्हतो.
आता जरी या सगळ्याचे लगेच परिणाम दिसले नाही तरी याचे दीर्घ काळाचे परिणामांचा अभ्यास अजून कोणीच केलेला नाही. तो अभ्यास जर झाला तर कदाचित याचे गंभीर परिणाम देखील समोर येऊ शकतील.
आवाजाचे मानसिक परिणाम देखील..
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील देशमुख म्हणाले, जास्त आवाजाचा परिणाम हा मानसिक रुग्णासोबतच लहान मुले आणि सामान्य व्यक्तींनाही होतो.
अनेक शोधनिबंधातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की यामुळे पॅनिक अॅटक येणे, चिडचिडेपणा वाढणे, मूड स्विंग होणे, लक्ष विचलित होणे पासून ते मळमळ होणे, चक्कर येणे इथपर्यंतही हा त्रास पोहोचतो. हे परिणाम निरोगी व्यक्तीत पुढचे काही दिवस तर मानसिक रुग्णांमध्ये दीर्घ काळासाठी दिसतात.
डीजेचा आवाज किती असावा?
प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमानुसार साउंड सिस्टिममध्ये आवाजाची पातळी ही ४५ ते ५५ डेसिबल पेक्षा जास्त नसावी. परंतु अनेकदा या पातळीच्या कितीतरी अधिक पटीने हा आवाज असतो.
या वर्षी झालेल्या गणेशोत्सवात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने राज्यातील १३२ ठिकाणी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पथके नेमली होती. यासाठी तब्बल १८ लाख ५७ हजारांचा खर्च करण्यात आला होता. दरवर्षी अनेक गणेश मंडळांना नोटीसा देखील पाठविण्यात येतात.
प्रदूषण महामंडळ नियमानुसार आवाजाची मर्यादा
रहिवासी भाग - दिवसा ५५, रात्री ४५ डेसिबल
औद्योगिक भाग - दिवसा ७५, रात्री ७० डेसिबल
व्यावसायिक भाग - दिवसा ६५, रात्री ५५ डेसिबल
शांतता क्षेत्र - दिवसा ५०, रात्री ४० डेसिबल
व्यापक उत्तर शोधण्याची गरज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.आरती नगरकर म्हणतात की, अलीकडे हा ट्रेंड का वाढतो आहे हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. उत्सवाचे हे बदलते रूप मोठा सामाजिक आणि वैद्यकीय प्रश्न निर्माण करू शकते.
यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज आहे. तरुणांमधील मोठ्या प्रमाणात जी ऊर्जा आहे ती कदाचित राजकीय इच्छाशक्तीने विधायक गोष्टीकडे वळविता येऊ शकते. (Latest Pune News)
या सगळ्यामागे सोशल मीडिया आणि त्यातून निर्माण केली जाणारी आभासी प्रतिमा हे देखील कारण असू शकते. आजही चांगले उपक्रम उत्सव काळात होतात पण ते एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित राहिले आहेत. या उपक्रमांना व्यापक स्वरूप आणण्यासाठी सामाजिक चळवळ, राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे.
आवाजापासून त्रास होत असेल तर काय कराल?
१ अनेकदा आवाजाची पातळी ठरविणे आपल्या हातात राहत नाही, परंतु संभाव्य ठिकाणाहून आधीच दूर जाणे शक्य आहे.
२ महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडे तुम्ही जास्त आवाजाविषयी तक्रार करू शकता. यासाठी https://mpcb.gov.in या संकेतस्थळावर जा.
३ मंडळांना नियमांची आठवण करून देणे, त्यांना विनंती करणे या गोष्टी देखील आपण ध्वनी प्रदूषणापासून वाचण्यासाठी करू शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.