Police 
पुणे

हवेलीत अवैध धंदे जोमात; तर पोलीस प्रशासन 'हप्ता वसुली' करण्यात मग्न

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी 'हप्ता वसूल' करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावापासून पानशेत जवळील आंबीपर्यंत हवेली पोलीस ठाण्याची हद्द आहे. एकूण सतरा गावांचा यामध्ये समावेश आहे. यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

जमिनीच्या प्रकरणांमध्ये वाढता हस्तक्षेप...
मागील काही दिवसांपासून पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा जमिनविषयक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप वाढलेला दिसून येत आहे. प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना एखाद्याची बाजू घेऊन दुसऱ्यावर अन्याय केला जात आहे. अशाच एका प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हणणे ऐकून न घेता मला मारहाण करत भींतीवर डोके आपटल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येईल, असा गंभीर आरोप एका तरुणाने केला आहे. 

परवाने नसताना मद्यविक्री
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते असल्याचे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.

चोरी, खून, दहशत माजवणे अशा घटनांमध्ये वाढ
पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, व्यावसायिकांना लूटणे, मारहाण करून दहशत निर्माण करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याबाबत मात्र पोलीस कठोर कारवाई करताना दिसत नाहीत.

"सामान्य नागरिक, महिला यांना या अवैध धंद्यांचा अफाट त्रास होत आहे. अल्पवयीन मुलांमध्येही नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबीक वाद होत आहेत. पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे."
- खुशाल करंजावणे, सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

"सिव्हिल प्रकरणांमध्ये अधिकार नसताना पोलीस हस्तक्षेप करत आहेत. जेथे गरज आहे, त्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य मिळत नाही. पोलीस अधिक्षकांनी याबाबत दखल घेणे आवश्यक आहे."
- नरेंद्र हगवणे, माजी उपसरपंच, किरकटवाडी.

"पोलीस स्टेशन एवढे छोटे आहे, त्यामध्ये एवढ्या मोठमोठ्या गोष्टी कुठे घडत आहेत आणि कोण करत आहे हेच समजत नाही. सर्व मुद्दे निराधार, खोटे आणि चुकीचे आहेत, असे माझे मत आहे."
- सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

"मी आज पहाटे  लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची टीम पाठवून अवैध दारू विक्रीवर कारवाई केली आहे. अवैध धंद्यांची तक्रार करावी. तसे दिसून आल्यास संबंधित प्रभारी अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली जाईल."
- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT