पुणे ः गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव करण्यासाठी पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र साडे चार ते पाच लाख घरगुती गणपती विसर्जनासाठी नागरीक घराबाहेर पडल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळेच नागरीकांनी घरात किंवा सोसायट्यांमध्येच मुर्ती विसर्जन करावे. मुर्तीदान किंवा पर्यावरण पुरक गणेशमुर्ती घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिका व पोलिस यंत्रणांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढ होऊ नये, यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर मंगळवारी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी प्रासारमाध्यमांशी संवाद साधला. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, बच्चन सिंग, प्रसाद अक्कानवरु आदी उपस्थित होते.
महापौर मोहोळ म्हणाले, ""नागरीकांनी यंदा घराच्या गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करावे. त्यास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबरोबरच मुर्तीदानासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत व्यवस्था केली जाईल. नागरीकांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे.''
डॉ.शिसवे म्हणाले, "शहरात पावणे पाच लाख घरगुती गणपती असून त्यांच्या विसर्जनाचा मुख्य प्रश्न आहे. विसर्जनासाठी एका घरातुन चार जण घराबाहेर पडल्यास 20 लाख लोक घराबाहेर येतील, त्यामुळे संसर्ग वाढीचा धोका वाढेल. त्याऐवजी नागरीकांनी, आपापल्या घरी, सोसायटीतच गणेश मुर्तीचे विसर्जन करावे. शहरात 3 हजार 300 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी अनेक मंडळे एकत्र उत्सव साजरा करणार आहेत. केवळ 30 ते 35 टक्के मंडळांनाच छोटा मंडप टाकण्याची परवानगी द्यावी लागण्याची शक्यता असून त्याबाबत स्थानिक पातळीवर पोलिस, महापालिका चर्चा करत आहे.''
यावेळी धर्मशास्त्र विचार मंडळाचे सदस्य वेदमुर्ती डॉ.माधव केळकर यांनीही कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घरगुती गणशोत्सव कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.केळकर यांच्यासह धर्मशास्त्र विचार मंडळाचे सदस्य प्रकाश दंडगे, पंकज केळकर, मंदार खळदकर यांनीही पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे.
आदर्श गणेशोत्सवासाठीची हीच चांगली संधी आहे. फिरत्या हौदात गणेश मुर्ती विसर्जनाची घोषणा महापालिकेने केली असून त्याचे अन्य शहरांमधून स्वागत केले जात आहे. याबरोबरच पोलिंग बुथप्रमाणे शहरात सर्वत्र मुर्तीदान व संकलनाची व्यवस्था करावी. मंडळांनी दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था केल्यास नागरीक घराबाहेर येणार नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गाला अटकाव बसेल.- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त.
वेदमुर्ती डॉ.माधव केळकर म्हणाले..
- पुजनासाठी लहान तळहाताऐवढ्या व मातीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी
- घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करणे शास्त्राला धरुनच
- गणेश याग, सहस्त्रावर्तने, मंत्रजागरसारखे धार्मिक कार्यक्रम अनिवार्य नाहीत
- यंदा पुरोहितांनी सहस्त्रावर्तनाचा गट तयार केलेला नाही
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.