Independence Day - पुण्यात अगदी अलीकडच्या काळापर्यंत काही वास्तू आणि ठिकाणे या शहराची ओळख होती, मैलाचे दगडं होती. पुण्यातल्या मध्यवर्ती भागातली महात्मा फुले मंडईची नाविन्यपुर्ण आकाराची इमारत, मध्यवस्तीतला शनिवारवाडा, पुणे कॅम्पाव्या एका तोंडाशी असलेले लाल रंगाचे आणि म्हणून लाल देऊळ याच नावाने ओळखले जाणारे ज्यु धर्मियांचे प्रार्थनास्थळ म्हणजे सिनेगॉग.
तिकडे शहराच्या आणखी एका टोकाला वानवडीजवळ आणि रेस कोर्ससमोर असलेले १८६० साली बांधले गेलेले भव्य आकाराचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि गुरुवार पेठेतील उंचच उंच मनोरा असलेले पवित्र नाम देवालय अर्थात होली नेम चर्च. शहराच्या उंच भागावर असलेले पेशवेकालीन पर्वती मंदिर सुद्धा असेच.
क्वार्टर गेटपाशी असलेले आणि माधवराव पेशवे यांनी १७९२ साली दिलेल्या जागेवर उभे असलेलें छोटेखानी सिटी चर्च मात्र तसे दुर्लक्षित राहिले, हमरस्त्यावर नसल्याने आजही या ऐतिहासिक वास्तुकडे सहज लक्ष जात नाही.
त्याकाळच्या पुण्याच्या सिमित क्षितिजावर दुरुन या वास्तू कुणाचेही लक्ष वेधून घ्यायच्या. शहराच्या स्कायलाईनवर त्यांचे महत्त्वाचे स्थान असायचे.शहरात टोलेगंज उंच इमारतींचे आक्रमण झाल्यापासून या वास्तू लांबून दिसेनाशा झाल्या आणि आधी नजरेआड झाल्यावर त्या मग स्मृतीआड सुद्धा झाल्या.
तर यापैकी प्रत्येक वास्तूला इतिहास आहे. उदाहरणार्थ , पुणे नगरपालिकेने भाजी मंडईसाठी खूप पैसे खर्चून एक वास्तू उभारण्यास त्यावेळचे सरकारनियुक्त नगरसेवक जोतिबा फुले यांनी विरोध केला होता, हा पैसा त्याऐवजी लोककल्याणासाठी वापरावा, असा त्यांचा आग्रह होता.
मात्र ही मंडईची इमारत उभी राहिली आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे (Lord Reay) यांचे नाव त्या मंडईला देण्यात आले. कालौघात महात्मा जोतिबा फुले यांचेच नाव या मंडईला देण्यात आले.
तर टोलेजंग बांधकाम आणि उंच मनोरा असणारी पवित्र नाम देवालय ही वास्तू खूप लांबूनसुद्धा दिसायची. आता यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. या पवित्र नाम देवालयाच्या निर्मितीनंतर पंजाबमधील मिस्टीक किंवा गूढवादी ख्रिस्ती धर्मगुरू साधू सुंदरसिंग यांनी भेट दिली होती.
या वास्तूमध्ये पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जगाला हादरवून सोडणारी चहापान प्रकरण किंवा ग्रामण्य घडले होते. त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना आपल्याच जातीच्या लोकांचा सामाजिक बहिष्कार सोसावा लागला होता, दोनदा - एकदा - काशीला जावून प्रायश्चित घ्यावे लागले होते.
समाजातील दांभिकता आणि आचारविचारातली विसंगती उघडकीस आणण्यासाठी गोपाळराव जोशी यांनी ' पुणे वैभव' या वृत्तपत्राच्या माध्यमातून घडवून आणलेले हे प्रकरण म्हणजे भारतीय पत्रकारितेतले पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन..
हा झाला भूतकाळ
आजही होली नेम चर्च प्रकाशझोतात येत असते. याचे कारण म्हणजे ही ऐतिहासिक वास्तू आहे. या पवित्र नाम देवालयात उंच मनोऱ्यात असलेल्या मोठ्या घंटांचा संगीतमय घंटानाद अजूनमधून बातमीचा विषय होत असतो.
आजचे निमित असे आहे की सालाबाद प्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी या पवित्र नाम देवालयाच्या घंटा आपल्या अनोख्या मंजुळ आवाजात राष्ट्रगीत गाणार आहेत.पंचहौद चर्चमधील या भव्य आकाराच्या या आठ घंटा अर्थातच ऐतिहासिक आहे, त्याविषयीसुद्धा लिहिण्या सारखे आहेच.
तर दर नाताळाला या घंटांमधून क्लासिकल म्हणजे अभिजात कॅरोल साँग्स किंवा नाताळ गीते गायली जातात आणि दरवर्षी स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्र गीत गायले जाते.
आहे की नाही नाविन्यपूर्ण गोष्ट ?
पूर्वी काळी पुणे शहर आजच्या सारखे गजबजलेले नसताना हा १३० फूट उंचीचा चर्चचा बेल टॉवर खूप लांबून दिसायचा आणि घंटानाद फार दूरवर काही मैल अंतरावर ऐकू यायचा.
आता सगळीकडे मोठ्या इमारती उभ्या राहत असताना हे चर्च दिसेनासे झाले आणि चर्चच्या घंटानादाचा आवाजसुद्धा दबला गेला आहे.
हा मंजुळ, संगीतमय वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी जुनी आणि नवी पिढी खास कष्ट घेत असतात. यावेळी चर्चच्या सभासदांपैकी चार जण हे चर्चबेल्समधून सा, रे, ग, म या धुनीतून `जन गण मन अधिनायक जय हे’ राष्ट्रगीत साकारतील. जुन्या पिढीतील लोकांकडून त्यांनी ही कला शिकून घेतली आहे.
नव्वदच्या दशकात मी एका इंग्रजी दैनिकात असताना पुण्यात डेक्कनला राहत असताना खरं तर हा संगीतमय घंटानाद ऐकण्याची संधी मी गमावली असे आता वाटते.पुण्यात गुरुवार पेठेजवळ किंवा आसपास राहण्याऱ्या लोकांना हे राष्ट्रगीत ऐकता येईल. राष्ट्रगीत ऐकू इच्छिणाऱ्या इतरांना त्यासाठी तेथे पहाटे, दुपारी किंवा संद्याकाळी खास जावे लागेल.
स्वातंत्र्यदिनी मंगळवारी तिनदा घंटानाद माध्यमातून `जन गण मन अधिनायक जय हे' राष्ट्रगीत ऐकता येईल. चर्चबेलमधून राष्ट्रगीत बजावण्याची वेळ आहे सकाळी सहा वाजता, दुपारी बारा वाजता आणि संद्याकाळी सहा वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.