पशुपक्ष्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार
कासवर कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाई; वनविभाग, समितीकडून उपक्रम
कास, ता. २ ः जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात वन्य पशुपक्ष्यांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वनविभाग व कास पठार समितीकडून यापूर्वी तयार करण्यात आलेल्या ३६ कृत्रिम पाणवठ्यांच्या साफसफाईचे काम सुरू आहे.
सध्या वन्य पशुपक्ष्यांना कास पठार परिसरातील कुमुदिनी तलाव, कास तलावात पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध असले, तरी जंगलात ठेवलेल्या या कुंड्यांमध्ये दररोज नियमितपणे वेळच्या वेळी पाणी सोडले जाते. तत्पूर्वी हे कृत्रिम पाणवठे साफ करण्याचे काम सुरू आहे.
कास पठार व आसपासच्या परिसरात वन्य पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठ्याच्या कुंड्या गेल्या सात- आठ वर्षांपासून कास पठार समितीकडून ठेवण्यात आल्या आहेत. उन्हाळा सुरू झाला की पाण्याचा प्रश्न भेडसावतो, तसेच झऱ्याचे पाणीही काही अंशी कमी होत जाते. कास पठार परिसरातील बिबट्या, अस्वले, सालिंदर, रानडुकर, ससे, भेकर, सायाळ, खवले मांजर, सांबर, रानकुत्री, रानगवे, वानर, माकड, पिसोरी सारख्या अनेक पशू, उभयचर प्राणी, तसेच पक्षी, कीटक, फुलपाखरे यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी आणखी काही आठवडे असेल अशी परिस्थिती आहे.
कास तलाव वगळता अन्यत्र पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांची उणीव भासू नये, तसेच पाण्याअभावी त्यांच्या जीवितास धोका पोचू नये, या कारणास्तव कास पठार समिती व वनविभागाद्वारे अंधारी परिसर, धावली परिसर, वांजळवाडी, कुसुंबीमुरा, आटाळी, घाटाईफाटा, कास पठार, एकीव, तसेच बामणोली बाजूकडील परिसर, कास तलावाच्या पलीकडील परिसरात ठेवण्यात आलेल्या साधारणतः छत्तीस कृत्रिम पाणवठ्यावर नियमित वेळच्या वेळी पाणी सोडले जाते.
त्यामुळे पठार परिसरातील वन्य पशुपक्ष्यांची तहान भागण्यास मदत होत असते. सध्या पाणी उपलब्ध असल्याने पुढील काळात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी सद्यःस्थितीला कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यापूर्वी पाणवठ्यांची साफसफाई सुरू आहे.
----------------------------
चौकट
समितीमार्फत ३६ कृत्रिम पाणवठे
जंगलातील प्राणी, पक्षी यासाठी कास पठारावर आणि आजूबाजूच्या परिसरात कास पठार समितीच्या वतीने गेल्या सात- आठ वर्षांपासून ३६ कृत्रिम पाणवठे तयार केले असून, उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई भासल्यावर कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडले जाते.
-----------------------------
कोट
कृत्रिम पाणवठ्याची वनविभाग व समितीच्या कर्मचाऱ्यांकडून मागील काही आठवड्यांपासून साफसफाई सुरू आहे. काही ठिकाणी पाणी सोडले जात आहे, जेणेकरून पुढील काळात उन्हाळा सुरू झाल्यावर वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबण्यास मदत होईल.
- संदीप जोपळे,
वनक्षेत्रपाल सातारा, जावळी.
--------------------------------
04504
कास : येथील पठारावरील काही भागांतील छोटी तळी आटली आहेत. वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी तळ्यात वनविभाग व कास समितीमार्फत टॅंकरद्वारे सोडलेले पाणी. (अर्चना पवार : सकाळ छायाचित्रसेवा)
04500
कास : येथील परिसरातील कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाई करताना कास समितीचे सदस्य. (अर्चना पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.