येळकोट येळकोट, जय मल्हार...
पाल (ता. कऱ्हाड) येथील मार्तंड देवस्थान खंडोबा यात्रेचा आज (शुक्रवारी) मुख्य दिवस. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इतर राज्यातून भाविक मल्हारी- म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी पालनगरीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांत पालच्या श्री खंडोबाची यात्रेचा समावेश होतो. पाल या गावचे मूळ नाव राजापूर असे होते. श्री खंडोबाची निष्ठावान सेविका पालाई गवळण हिच्या नावावरून या गावाचे नाव पालाई पडले. त्यानंतर यास पाली व पाल असे झाले असावे, असे म्हटले जाते. नदीच्या दक्षिण-पश्चिमेस बाजूस पाली तर उत्तर पूर्व दिशेस राजापूर म्हटले जाते.
येथील खंडोबा मंदिर हे आबा पाढोदे नावाच्या वाण्याने बांधले आहे. मंदिराच्या मध्यभागी मेघडंबरी आहे. त्यामध्ये शाळुंकेवर खंडोबा - म्हाळसा यांची स्वयंभू लिंगे असून, त्यांच्यापुढे गादीवर दोघांचे मुखवटे ठेवलेले आहेत. मेघडंबरीमागे घोड्यावर सपत्नीक बसलेल्या खंडोबा व प्रघान हेगडी यांच्या पितळी मूर्ती आहेत. उजव्या हाताला बाणाईची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. हे मंदिर पूर्वेस तटबंदी व फरसबंदी प्रकारात बांधलेले आहे. दक्षिण दरवाजा अधिक मोठा असून, त्याचा वापर जास्त स्वरूपात होतो. पूर्व दरवाजाने आत येताच दोन्ही बाजूस दीपमाळ आहेत. दरवाजासमोर नंदीचा मंडप आहे. त्याच्या उत्तर- दक्षिण बाजूस चार दीपमाळ, तसेच तुळशी वृंदावन व खंडोबाचे एक लहानसे मंदिर आहे. यातील मूर्ती बैठी असून, चार हातांची व त्यात एक खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपत्र घेतलेली आहे. या मूर्तीच्या मांडीखाली मणी व मल्ल दोन दैत्याची मस्तके आहेत.
या वेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, भाविक लंगर तोडणे, जागरण, नैमित्तिक वाघ्यामुरळी बनणे, पशू बळी देणे व भंडारा खोबरे उधळणे असे विधी केले जातात. दर वर्षी पौष महिन्यातील शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा व म्हळसा विवाह यात्रा भरते.
यात्रेच्या आदल्यादिवशी देवकार्य असते. या दिवशी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यावर वाघ्या-मुरळी यांना बोलावून तळी उचलली जाते. यानंतर संपूर्ण कारखाना(देवाचे कारुखदार) देवाच्या आरतीसाठी मंदिराकडे रवाना होतात. दुसऱ्यादिवशी म्हणजे, यात्रेच्या मुख्य दिवशी खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी आलेले मानकरी मंडळी हे वाड्यावर येऊन देवस्थानच्या प्रमुख मानकऱ्यांना श्रीफळ भेट देऊन जातात. या वेळी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून आलेले मानाचे ९ गाडे व पालीमधील काटे- देशमुख यांचा १ असे १० गाडे असतात. यात सासनकाठ्या, पालखी असतात. कोल्हापूर येथील मानाचे चोपदार मानकरी यांचा घोडा असतो. मिरवणुकीपूर्वी दुपारी बारा वाजता चोपदारांचा घोडा बहुल्यापासून मंदिराकडे रवाना होते. दुपारी दीडपासून देवस्थानचे प्रमुख मानकरी यांच्या वाड्यापासून रथातून मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीत देवस्थानचा ढोल्या, गडशी, भालदार, ठाकर, नाभिक समाजाचे आरशेवाले, माळी समाजाच्या फुलांच्या सहा छत्र्या, पवार, सोनवणे मानकऱ्यांच्या सासनकाठी, पाली व मरळी येथील सोनवणे, नाईक हे दोन रखवालदार असतात. सुरुवातीस औक्षण करून प्रमुख मानकरी रथात विराजमान होतात. मिरवणुकीस प्रारंभ केला जातो. यानंतर मिरवणूक मुख्य मंदिरात येते. यावेळी मंदिराच्या ओवरीमध्ये (सभामंडपात) देवाचे मुख्य मानकरी व इतर चार मानकरी हे थांबल्यानंतर देवाची धुपारती सुरू होते. धुपारती बाहेर आल्यानंतर देवाची प्रभावळ पुजारी मंडळी काढून घेऊन वाघे समाजाच्या हाती देतात. ती धुपारती पाठी देवाची प्रभावळ मागे येते. यानंतर देवाचे मुख्य मानकरी व इतर चार मानकरी मंदिरात (गाभाऱ्यात) प्रवेश करतात. यावेळी पुजारी मंडळी खंडोबा व म्हाळसाची मूर्ती मुख्य मानकऱ्यांच्या हातात देतात. खंडोबा व म्हाळसा यांच्या सिंहासनावर बानाई विराजमान केली जाते. या मूर्ती मंदिरातून बाहेर घेऊन येत असताना पुढे भालदार व रखवालदार हे देवाचे मुख्य मानकरी यांना गावकरी खांद्यावर उचलून पालखीपाशी घेऊन येतात. पालखी उचलण्याचा मान हा भाेई समाजाकडे दीपक शिंदे व इतर बंधूंकडे असतो. यावेळी या मूर्ती त्यांच्याकडे स्वाधीन केल्या जातात. मूर्ती पालखीत ठेवल्या जातात. त्यानंतर ओवरीत उभे असणारे देवाचे मुख्य मानकरी यांना गावातील लोक खांद्यावर उचलून पालखीपर्यंत आणतात. यावेळी पालखीतील मूर्ती मुख्य मानकरी हे स्वतःजवळ घेऊन या मूर्ती पोटास बांधतात.
त्यानंतर गावकरी पुन्हा पालखीपासून मुख्य मानकरी यांना खांद्यावर घेऊन मंदिरद्वारापाशी उभ्या असणाऱ्या शिवणकऱ्यांच्या गाड्यामध्ये बसवतात. यानंतर हा गाडा हळूहळू अंधारसज्जापाशी (मुख्य प्रवेशद्वार) येतो. यावेळी गाड्यातून पुन्हा गावकरी खांद्यावरून मुख्य मानकऱ्यांना उभ्या असणाऱ्या रथात विराजमान होतात. यानंतर पुन्हा सर्व मानकरी गावकरी यांच्यासह बहुल्याकडे (लग्न मंडपाकडे) मिरवणुकीस सुरुवात होते. त्यानंतर मिरवणूक वाळवंटात येते. यावेळी येळकोट येळकोट, जय मल्हार... सदानंदाचा येळकोट भंडाऱ्याची उधळण करत सारा परिसर दुमदुमून जातो. यावेळी पुजारी देवास स्नान घालतात व देवास मुंडवळ्या बांधतात. त्यानंतर गोरज मुहूर्तावर देवाचे उपाध्ये प्रकाश पोटे हे वस्त्र धरून विधिवत देवाचा लग्नसोहळा पार पाडतात.
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.