भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्वास
वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. तर, मागील वेळी तिरंगी लढतीतील मतविभाजनाचा फायदा बारणे यांना झाला. त्या वेळी विरोधी उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज पाहता किमान ६० हजार मतांनी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. निकालाच्या एक दिवस अगोदर ‘सकाळ’ने या दोन्ही नेत्यांशी संवाद साधून निकाल काय लागेल, याविषयी त्यांची मते जाणून घेतली.
प्रश्न - निकाल कसा राहील?
भेगडे - मावळ, चिंचवड व पनवेल या मतदारसंघात भाजपचे आणि पिंपरी व उरण मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असल्याने महायुतीची बाजू भक्कम होती. सर्वच मतदारसंघांत युतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने व ताकदीने काम केल्याने बारणे यांचा विजय नक्की आहे.
प्रश्न - पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. शेकापचीही त्यांना भक्कम साथ मिळाली. त्याचे प्रतिबिंब निकालात दिसणार नाही का?
भेगडे - पार्थ हे बाहेरील व एकदमच अननुभवी उमेदवार होते. त्यांना जरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले, तरी मतदारांनी मात्र त्यांना स्वीकारलेले नाही. याउलट बारणे हे अनुभवी उमेदवार आहेत. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळविला. जनतेच्या कायम संपर्कात राहिले. त्यामुळे जनतेने पुन्हा त्यांनाच पसंती दिल्याचे निकालात दिसून येईल.
प्रश्न - कोणत्या मतदारसंघात मजबूत राहाल?
भेगडे - मावळ, पनवेल व चिंचवड येथे चांगली आघाडी मिळेल. मावळ मतदारसंघात आम्ही सुमारे २५ हजार मतांची आघाडी देऊ.
प्रश्न - निकालात कोणते मुद्दे प्रभावी ठरलेले दिसतील?
भेगडे - घराणेशाही व अननुभवी उमेदवार हेच आघाडीच्या उमेदवाराबाबतचे मुद्दे प्रभावी ठरतील. मावळ गोळीबार प्रकरणही मतदार अद्याप विसरलेले नाहीत. दुसरीकडे, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अनेक मतदार स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. त्याचे प्रतिबिंब निश्चित निकालात दिसेल.
प्रश्न - पवार घराण्याच्या वलयामुळे लढत खडतर बनली?
भेगडे - बिल्कुल नाही, उलट अनुभवी विरुद्ध अननुभवी उमेदवार असेच लढतीचे स्वरूप होते. पवार घराण्यातील उमेदवारामुळे युतीच्या कार्यकर्त्यांनी ईर्षेने काम केले, तर मतदारांनी वलय असलेल्या घराण्यातील उमेदवारापेक्षा अनुभवी, सर्वसामान्य, जनसंपर्कातील कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या उमेदवारालाच पसंती दिल्याचे दिसून आले.
प्रश्न - आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता या निकालामुळे राजकीय समीकरणे बदलतील का?
भेगडे - बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीच घवघवीत यश मिळवेल व मावळमध्येही बारणेच विजयी होतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे निकालानंतर युतीची बाजू आणखी बळकट होईल.
प्रश्न - पार्थ यांच्या उमेदवारीमागील कोणती गणिते मांडली?
पाटील - खासदार बारणे यांना मागील वेळी मिळालेल्या मतांच्या संख्येपेक्षा विरोधी उमेदवारांना अधिकचे मतदान झाले होते. तिरंगी लढतीचा फायदा बारणेंना झाला होता. या वेळी काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसोबत इतर समविचारी पक्षांची मते पाहता वेगळे गणित मांडण्याची कोणतीही गरज भासली नाही.
प्रश्न - शेकापची नक्की भूमिका काय होती?
पाटील - शेकापकडे मतदारसंघात लढण्यासारखा उमेदवार नव्हता. पवार कुटुंबाचा असलेला करिष्मा, युवा आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून पार्थ यांना मिळणारा पाठिंबा, या एकाच बाबीचा विचार करून पार्थ यांच्यासाठी उमेदवारी मागून घेतली आहे. यामागे इतर कोणताही हेतू नसून मतविभागणी टाळल्यास विजय खेचून आणू शकतो, हा एकच हेतू यामागे आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क मजबूत आहे. कार्यकर्त्यांच्या त्या नेटवर्कचा विजयासाठी वापर केला. त्याव्यतिरिक्त इतर काही विशेष प्रयत्नांची गरज भासली नाही.
प्रश्न - विजयाचे गणित नक्की कसे असणार?
पाटील - रायगड जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतून पार्थ यांना आघाडी देणार आहोत. पनवेल मतदारसंघातून किमान १६ हजारांची आघाडी पार्थ यांना मिळणार असून, उरण आणि कर्जत मतदारसंघातून मोठी आघाडी घेऊन पार्थ विजयी होतील. सहापैकी पाच मतदारसंघांतून पार्थ यांना आघाडी मिळेल, हा विश्वास आहे. पार्थ यांच्यासाठी पनवेल, उरण आणि कर्जत मतदारसंघात शेकापने प्रामाणिक प्रयत्न केले असून, त्याचे फळ निकालातून मिळणार आहे.
प्रश्न - बारणे यांना मतदार का नाकारतील?
पाटील - मतदान करावे असे कोणते एक काम मावळ मतदारसंघात बारणे यांनी केले आहे? पनवेल, उरण परिसरातील पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी पार्थ यांच्या पारड्यात आपले मतदान टाकले आहे. गेल्या वेळेप्रमाणे कोणतीही लाट या वेळी नाही. तसेच, मागील वेळी पंचवीस ते तीस टक्के मुस्लिम मते मिळविण्यात भाजपला यश मिळाले होते. या वेळी ती परिस्थिती नाही. पनवेल, उरण मतदारसंघात ठाकूर कंपनीने बारणे यांच्यासाठी चांगले काम केले नाही. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम बारणे यांचा पराभव होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.