पुणे - हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे हाच आहे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे; पण कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी निर्जंतुकीकरणाशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे हाताचे सातत्याने निर्जंतुकीकरण अनिवार्य आहे; पण गेल्या तीन महिन्यांत सतत हॅंड सॅनिटायझर वापरल्याने त्याचा दुष्परिणाम काहींच्या हातांवर जाणवू लागला आहे. अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.
हॅंड सॅनिटायझरचा वापर
दिवसभरात हॅंड सॅनिटायझर किती वापरावे असा निश्चित कोणताही निकष नसल्याचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आनंद पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले, ""प्रत्येक रुग्ण तपासल्यानंतर आम्ही हात सॅनिटाईज करतो. त्याचप्रमाणे नागरिकांनाही प्रत्येक काम झाले की सॅनिटायझर वापरण्याची गरज आता आहे. लिफ्टमधून वर गेला, गाडीवरून कार्यालयात आल्यानंतर, बाजारपेठ अशा प्रत्येक ठिकाणी हातावर सॅनिटायझर घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी थेंबभर सॅनिटायझर पुरेसे होते.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रिऍक्शनच्या तक्रारी
कोरोनाच्या उद्रेकानंतर पुण्यातील नागरिक तीन महिने सॅनिटायझर वारंवार वापरत आहेत. बाहेर जाऊन आल्यानंतर, बाहेर फिरताना, कोणत्याही व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ करायचे, असा दिनक्रमाचा भाग झाला आहे; पण त्यामुळे सॅनिटायझरची रिऍक्शन काही जणांमध्ये दिसत आहे. त्यात प्रामुख्याने हात कोरडा पडणे, हाताला खाज सुटणे, ऍलर्जी असे प्रकार दिसतात.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
सॅनिटायझरमुळे होणारी रिऍक्शन थांबविण्यासाठी मॉइश्चरायझर करणे, हा त्यावरील एक उपाय असल्याची माहिती त्वचारोग तज्ज्ञांनी दिली. दिवसभर सॅनिटायझर वापरल्यानंतर रात्री झोपताना हात स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि योग्य असेल त्या प्रमाणात मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. सॅनिटायझर वापरत राहा; पण त्याची रिऍक्शन झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही त्यांनी सांगितले.
हात धुणे हाच पर्याय
कोरोनाच्या उद्रेकात हॅंड सॅनिटायझरला पर्याय काय, या प्रश्नाचं उत्तर दिवसभरात वारंवार साबण लावून स्वच्छ पाण्याने हात धुणे असे आहे. हाताची स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याला कोणताही पर्याय नाही.
सॅनिटायझर लिक्विड ते स्प्रे
सॅनिटायझर हे तळहातावर घेऊन त्यातून हात निर्जंतुक करायचे असतात, हे पुणेकरांना माहिती होते; पण कोरोना उद्रेकामुळे सॅनिटायझरचा पुण्यात एका बाटलीपासून सुरू झालेला प्रवास कोरोना उद्रेकात स्प्रेपर्यंत आला आहे. आताच्या काळात निर्जंतुकीकरण हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीने होते, त्यापेक्षा ते किती प्रभावी होते, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मास्क आणि हाताचे निर्जंतुकीकरण या दोन गोष्टी काटेकोरपणे प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत. त्याच आधारावर कोरोना विषाणूंची साथ नियंत्रणात येईल. सॅनिटायझर हा एक हाताच्या निर्जंतुकीकरणाची पद्धत आहे. जिथे पुरेसे पाणी आणि साबण आहे, तेथे त्याचा वापर केला नाही तरीही चालेल.
-डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
सॅनिटायझर वापरायला लागल्यापासून काही रुग्णांना पुरळ, खाज अशी रिऍक्शन तिसऱ्या, चौथ्या दिवशी येते; पण हाताचा कोरडेपणा हा रुग्णाची त्वचा आधीपासून किती कोरडी आहे, त्यावर अवलंबून असते. सॅनिटायझर हे आताच्या काळाच अत्यंत महत्त्वाचे आहे.
-डॉ. नरेंद्र पटवर्धन, त्वचारोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.