वालचंदनगर, ता. ३० : ‘‘आईमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असते. मुलांच्या प्रगतीसाठी आईची सातत्याने धडपड सुरू असते. पुरस्कारप्राप्त महिलांनी मुलांना शिक्षणाचे धडे देऊन यशाच्या शिखरापर्यंत पोचवले आहे. त्यांचे कार्य अनमोल व कौतुकास्पद आहे,’’ असे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काढले.
कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमध्ये फडतरे पब्लिक ट्रस्टच्या वतीने शेळगावमधील ताराबाई विठ्ठल माने, कोल्हापूर मधील कृष्णाबाई यशवंत पाटील, दहिगाव (ता. माळशिरस)मधील राजश्री जगन्नाथ मोरे, साखरवाडी (ता. फलटण) मधील तेजस्विनी तानाजी संकपाळ, व पुणे येथील गीतांजली प्रकाश जगदाळे यांना लक्ष्मीबाई फडतरे आदर्श माता जीवनगौरव पुरस्काराने व बेलवाडी (ता. इंदापूर) येथील कै. हिराबाई हरिभाऊ देसाई व लोणी भापकर (ता. बारामती) येथील कै. राजाक्का बाबासाहेब भापकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी सारिका भरणे, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, नेचर डिलाइटचे प्रमुख अर्जुन देसाई, शिवप्रसाद उद्योग समूहाचे प्रमुख शरद मोरे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश जगदाळे, गणेश झगडे, उद्योजक पारगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जय फडतरे, हनुमंत फडतरे, डॉ. शैलजा फडतरे, उज्ज्वला फडतरे, संगीता फडतरे, कल्याणी फडतरे यांनी केले.