पुणे : शिरूर मतदार संघाचे खासदार अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांनी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच त्यांची सर्वात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची होय. या भूमिकेमुळे ते जमसामान्यांमध्ये अंत्यत लोकप्रिय अभिनेते झाले. पण या मालिकेच्या घडण्यामागे अनेक संघर्ष गाथा दडल्या आहेत. तोच संघर्ष खासदार कोल्हे हे अनेकदा सोशल मीडियाव्दारे उलगडवत असतात. सध्या त्यांचा याच संदर्भातला एक व्हिडीओ व एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये मालिका घडण्यामागचा संघर्ष त्यांनी रेखाटला आहे. नुसता रेखाटला नव्हे तर अक्षरश: डोळ्यासमोर उभा केला आहे.
मालिकेची सुरवात कशी झाली यापासून ते शुटींगचा शेवट कसा झाला याचाही उल्लेख कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. त्यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात,
*स्वप्नभंग ते स्वप्नपूर्तीची जिद्द!*
सहज फोन मेमरी पाहताना हा व्हिडिओ समोर आला आणि सर्रकन अंगावर काटा, शहारे, रोमांच एकाच वेळी अनुभवलं..
2017 चा पूर्वार्ध.. एका वाहिनीने छत्रपती संभाजी महाराज मालिका साकारण्याची संधी दिली होती... आमच्या जगदंब क्रिएशन्स साठी फार मोठी गोष्ट होती. मी, विलासकाका, घनश्याम झपाटून कामाला लागलो.. प्रताप गंगावणे सर, रविजी दिवाण, स्व. निर्मल जानी, नितीन कुलकर्णी, पूर्णिमा ओक, कार्तिक केंढे, राहुल रानडे, समीर कवठेकर,जयंत गिलाटर, पिंकुजी विश्वास सगळी माणसं पहाडासारखी पाठीशी उभी राहिली. मुंबईत सेट उभा राहिला, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते मुहूर्त झाला, माहुली, भोर परिसरात शूटिंग सुरू झालं..शैलेश दातार, आनंद काळे, प्रिया मराठे, किशोरी अंबिये, आभा वेलणकर, प्राजक्ता हनमघर, अमित देशमुख, राहुल बोडस.. एकूण भट्टी जमल्यासारखी वाटत होती..
11 दिवसांचं आऊटडोअर शूटिंग अगदी मनासारखं पार पडलं. उत्साहात मुंबईत परत आलो.. 2-3 दिवसात सेटवर शूटिंग सुरू करायचं होतं. शिवाजी मंदिरच्याऑफिसमध्ये मीटिंग बोलावली होती युनिटची आणि ऑफिसच्या पायऱ्या चढताना फोन आला..पलीकडे वाहिनीचे business head होते. त्यांनी सांगितलं की आपण ही मालिका नाही करू शकत. काळजात धस्स झालं, पोटात खड्डा पडला. क्षणात सगळं संपलं असं वाटलं. ९ वर्ष पाहिलेलं स्वप्न आत्ता कुठं अंकुरत होतं पण त्याच्याकडे डोळेभरून कौतुकाने पाहण्याआधीच खुडलं जात होतं.
हताश, निराश, सुन्न, बधिर या सगळ्याच्या पलीकडचा क्षण होता तो. शंभूराजे साकारण्याची संधी हुकली याचं दुःख होतं, प्रचंड आर्थिक दडपण होतं पण त्याही पेक्षा या निर्णयामागचं कारण समजत नव्हतं त्यामुळे चिडचिड होत होती. भिंतीला पाठ लागली होती; दोनच पर्याय होते- खचायचं किंवा उसळायचं....होय मी दुसरा निवडला.. उसळण्याचा.. आणि या उसळी घेण्याला महत्वाचा प्लॅटफॉर्म " झी मराठी" ने दिला. त्यासाठी निलेश मयेकर, सोजल सावंत आणि मृण्मयी कुबेर यांचे मनःपूर्वक आभार..!
समाजाला उसळणं दिसतं पण खचणं ते उसळणं हे स्थित्यंतर कधी दिसत नाही. या खचण्यापासून परावृत्त करून उसळण्याला प्रवृत्त करण्यात अनेकांचा हातभार लागला आहे. माझं कुटुंब, मित्र, वर उल्लेखलेली पहाडासारखी पाठीशी उभी राहणारी माणसं, ज्याने या कसोटीच्या काळात विश्वास दाखवला तो प्रत्येकजण..सर्वांचा मोलाचा वाटा आहे... आज सहज व्हिडिओ समोर आला ,आठवणींची तार छेडली गेली आणि सूर उमटला- हे तुमचं आहे, तुमच्यामुळे आहे! आभार मानणार नाही पण हे नक्की सांगेन की तुमच्यासोबत असण्याचा मला अभिमान आहे!
खासदार कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टव्दारे अशरक्ष: छत्रपती संभाजी महाराज मालिका घडतानाची संघर्षगाथा डोळ्यासमोर उभी केली आहे. त्यांनी संघर्ष करताना साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचा आपल्या पोस्टमध्ये आवर्जुन उल्लेख केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.