पुणे : लॉकडाउनमधील कठोर निर्बंधांना उघडपणे विरोध करणारे महापालिकेचे माजी आयुक्त शेखर गायकवाडांच्या काही सूचनांना नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी केराची टोपली दाखविली आहे. पुणेकरांना ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सवलतीवर 'लाल फुली' मारत कुमार यांनी लॉकडाउन कडक ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
दुसरीकडे आयुक्तपदाचा कार्यभार घेऊन काही तासही झाले नाहीत, तोच कुमार यांनी आपला अजेंडा पुढे केला. लॉकडाउनमध्ये पहिले काही दिवस ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविण्याची सेवाही बंद राहणार असल्याचे कुमार यांच्या नव्या आदेशात स्पष्ट झाले आहे. कुमार यांच्या स्टाइलने महापालिका प्रशासन आवाक झाले आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी सोमवारपासून (ता.13) लागू होणाऱ्या लॉकडाउनमधील बंधने आणि सवलतींबाबत सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून गायकवाड यांनी संभाव्य आदेशाही तयार करून ठेवले होते. त्यात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसह वसतिगृह आणि अन्य ठिकाणी राहणाऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविणाऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला होता. त्यानुसार अंमलबजावणीचे स्वरुप ठरले होते.
मात्र, संभाव्य आदेशातील बंधने आणि सवलतींवर नजर टाकून ऑनलाइन सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला. त्यापलीकडे जाऊन गायकवाड यांच्या निर्णयावर बारकाईने नजर फिरवत त्यात काही बदलही करण्याच्या सूचना कुमार यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, महापालिकेतील जुन्या रिती मोडीत काढत कुमार हे आपल्यापरीने कामाला लागले आहेत, हेच यानिमित्ताने सूचित झाले आहे.
महापालिकेत आयुक्तपदाची जबाबदारी घेऊन जेमतेम साडेपाच-सहा महिने झाली नाहीत, तोवरच गायकवाडांची बदली करून त्यांच्याजागी कुमार यांची नेमणूक झाली आहे. बदलीचा आदेश येऊन 24 तासही झाले नाहीत, तेव्हाच कुमार यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या सहीनेच सहाव्या टप्प्यातील लॉकडाउनचे आदेश काढले. महापालिकेत कुमार येताच गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे, अनिल मुठे यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, गायकवाड यांच्या बदली आणि कुमार यांच्या नेमणुकीने महापालिकेच्या वर्तुळात विशेषत: प्रशासनात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. अचानक बदली झाल्याने काही अधिकारी धास्तावले आहेत, आरोग्य खात्यातील अधिकारी गोंधळात पडले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.