ICMR-Test
ICMR-Test 
पुणे

पुणेकरांची घटत्‍या चाचण्यांच्या आड लपली रुग्णसंख्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांच्या प्रयोगशाळा चाचणीचा वेग कमी करून, कोरोना नियंत्रित केल्याचा धिंडोरा महापालिका प्रशासन पिटत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग फारसा कुठे कमी झाला नसल्याचे महापालिकेचीच आकडेवारी दाखवून देते. एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण आजही २७ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची वस्तुस्थिती आहे. मग, पुण्यातील कोरोनाची साथ कमी झाल्याचा दावा प्रशासन कशाच्या आधारे करत आहे, असा सवाल संसर्गजन्य रोगतज्ज्ञ विचारत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लक्षणे, चाचणी, उपचार या त्रिसूत्रीतील चाचणीची संख्या कमी केली आहे. गेल्या ३० दिवसांत पुण्यात चाचणीच्या तुलनेमध्ये सरासरी २९ टक्के नागरिक कोरोनाबाधित होत आहेत. म्हणजे सरासरी १०० नागरिकांची चाचणी केली, तर त्यापैकी २९ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान होत आहे. एक सप्टेंबरपासूनची आकडेवारी तपासली, तर महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांमध्ये कमी केल्याचे दिसत आहे. 

कोरोनाचे रुग्ण फारसे कमी होत नसतानाही महापालिकेने मात्र रोजच्या तपासणीत सरासरी १ हजाराची घट केली आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ बंद ठेवण्यापासून तपासणीच्या रोजच्या वेळाही कमी केल्या आहेत. 

आतापर्यंत सर्वाधिक एका दिवसांत सुमारे सव्वाआठ हजार नागरिकांची तपासणी केल्याची नोंद आहे. मात्र, त्या प्रमाणात रुग्णांचा आकडा वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला. त्यानंतर  तपासण्यांची संख्या कमी करीत, ती साडेसहा-सात हजारापर्यंतवर आणण्यात आली.

मुंबई पॅटर्न पुण्यात?
पुणे आणि मुंबई शहरांमध्ये कोरोना नियंत्रित असल्याचे दाखविण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कमी करण्याचा छुपा अजेंड सरकारमधील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी राबवीत असल्याची चर्चा आहे. मुंबईसारखे पुण्यातही चाचण्यांची संख्या कमी करण्याच्या हालचाली महापालिका करीत आहे. मात्र, पुणेकरांपासून लपून राहणार नसल्याच्या शक्‍यतेने अधून-मधून चाचण्या कमी करण्यात येत असल्याचे स्पष्ट आहे. पुण्यात कोरोना वाढत असल्याने पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त करीत, कोरोनाचा संसर्ग कमी झाला नाही; तर जबाबदार अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मात्र प्रशासनाने थेट काही प्रमाणात चाचण्या कमी करण्याला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येत आहे.

पाठ थोपटून घेण्याची ही वेळ नाही
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३२ वरून २४ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्याची माहिती महापालिकेने दिली. यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाचे पुणे संघटनमंत्री डॉ. अभिजित मोरे म्हणाले, ‘‘संसर्गाचा दर २४ हा खूप जास्त आहे. शास्त्रीय निकषांप्रमाणे पाहिल्यास हे प्रमाण ६ ते ७ टक्‍क्‍यांपर्यंत कमी आले पाहिजे, त्यामुळे पाठ थोपटून घेण्यात काही अर्थ नाही.’’

चाचण्या कुठं करता हे महत्त्वाचे
शहरातील संसर्गाचे चित्र बदलत आहे. शहराच्या मध्य वस्तीतील पेठा किंवा पूर्व भागात कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसतेय. पण, त्याच वेळी शहराच्या उपनगरांमध्ये हे प्रमाण वाढतेय. तेथील फ्लॅट आणि मोठ्या सोसायट्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे महापालिका नेमक्‍या कोणत्या भागात चाचण्या घेत आहे, हे महत्त्वाचे ठरते. शहराच्या मध्य भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्यानंतर संसर्गाचे दर कमी आल्यास आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मात्र, उपनगरांमध्ये हे प्रमाण किती आहे, यावर बारकाईने लक्ष दिले पाहिजे, असेही डॉ. मोरे यांच्यासह संसर्गजन्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

गणेशोत्सवानंतर काय घडले?
गणेशोत्सवानंतर एवढ्या तपासण्यांमध्ये रोजच्या रुग्णांची संख्या वाढून, ती अडीच हजारांपर्यंत गेली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आवाक्‍याबाहेर जात असल्याची कबुली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली होती. त्यानंतरही रोज सात हजार नागरिकांच्या तपासणीची नोंद राहिली. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून आता पुन्हा रोज सहाशे-आठशे नागरिकांची तपासणी कमी करून, तो आकडा साडेपाच हजारांपर्यंत आणला. त्यापेक्षा सोमवारी तर केवळ सव्वातीन हजार जणांचीच तपासणी झाल्याची नोंद आहे.

पुण्यात ‘आयसीएमआर’च्या सूचनांनुसार म्हणजे, ज्यांना तीव्र आणि सौम्य प्रमाणात लक्षणे आहेत; त्यांची प्राधान्याने तपासणी केली जात आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे अर्थात, ताप, सर्दी, खोकला नाही, अशांची तपासणी करीत नाही. मात्र, रुग्णांच्या संपर्कात (क्‍लोज कॉन्टॅक्‍ट) आलेल्यांची तपासणी होत आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT