सहकारनगर - अरण्येश्वर येथील ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये अद्याप पुराचे पाणी असून, सुमारे दीड हजार वाहने पाण्यातच आहेत. विद्युत मोटारी लावून पाणी काढण्यात येत असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पाणी काढण्याचे काम सुरूच होते.
आंबिल ओढ्याच्या पुराचे पाणी बुधवारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून पार्किंगमध्ये शिरले. पार्किंगमध्ये १२ फुटांपर्यंत पाणी साचले होते. पार्किंगमध्ये अंदाजे ४५० चारचाकी आणि १००० दुचाकी वाहने अडकली आहेत.
पाणी काढण्यासाठी सोसायटीच्या सभासदांनी; तसेच बांधकाम व्यावसायिकाने विद्युत मोटारी लावल्या आहेत. गुरुवारी सकाळपासून मोटारी सुरू आहेत. तीस तासांत ७५ टक्के पाणी काढण्यात यश आल्याचे रहिवाशांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून सोसायटीमध्ये वीज, पाणी आणि गॅस नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. लायन्स क्लब ऑफ पुणे डिजिटलतर्फे रहिवाशांना मदत पुरविण्यात येत आहे. नगरसेवक महेश वाबळे यांनी नाश्ता पुरवला. सोसायटीच्या अध्यक्ष लता देशपांडे, सचिव नितीन सरदेसाई, सभासद ज्योतिबा उबाळे, माउली कराळे, योगेश वाबळे, प्रशांत शिरोडे, प्रमोद गरड, प्रवीण भालेराव, मंदार भाटवडेकर, चेतन वडनेरकर, प्रशांत पाटील, संजय साळुंखे, बिपीन ताकवले, डॉ. सुधांशु ताकवले, संदीप खलाटे, शंतनु बिरोले हे घटनास्थळी थांबून मदत करीत आहेत.
के. के. मार्केटच्या पार्किंगमध्ये अडकली शेकडो वाहने
बिबवेवाडी/कात्रज : के. के. मार्केटचे पार्किंग पाण्याखाली गेले असून, शेकडो वाहने पाण्यात अडकलेली आहेत. के. के. मार्केट सात मजली इमारतीमध्ये असून, पुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
येथे नऊशे गाळेधारक असून पार्किंगच्या भागामध्ये चाळीस गाळे आहेत, त्यामध्ये अनेकांची गोदामे तसेच छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. बुधवारी रात्री झालेल्या पावसामध्ये पार्किंग व मार्केटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन कोट्यवधी रुपयांचा माल पाण्यामध्ये खराब झाला. पार्किंगमध्ये चारचाकी व दुचाकी मिळून दीडशे वाहने अडकून पडली आहेत. इमारतीचे सुरक्षा कुंपण वाहून गेले असून, सहा मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. प्रशासनाकडे वारंवार मदतीची मागणी करूनसुद्धा मदत मिळत नसल्यामुळे सभासदांनी स्वखर्चाने पार्किंगमधील पाणी काढण्याचे काम हाती घेतले.
नाट्यगृहात अडकल्या रिक्षा
अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये सुमारे वीस चारचाकी व तीस दुचाकी अडकल्या आहेत. रिक्षा बाहेर काढण्यासाठी गेलेले काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रिक्षाचालक नवनाथ निवंघुणे म्हणाले, ‘‘पाऊस सुरू झाल्यावर आम्ही पाच रिक्षाचालक साठे नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये गेलो होतो. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे आम्ही तिघे पोहत बाहेर आलो; परंतु दोघांची काही माहिती नाही. रिक्षा रस्त्यावर उभ्या असतात, त्यामुळे कोण रिक्षाचालक होते काहीही कळाले नाही.
बुधवारी रात्री नऊच्या सुमारास रस्त्यावरील पाणी पार्किंगमध्ये येऊ लागले. अनेकांनी दुकान, वाहने तशीच सोडून पहिल्या मजल्याचा आश्रय घेतला. रस्त्यावरील अनेक दुचाकी वाहत येऊन पार्किंगमध्ये अडकत होत्या. मार्केटची ओढ्यालगतची भिंत पडून अनेक वाहने डोळ्यांदेखत वाहत जात होती. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनसुद्धा कोणतीही मदत मिळालेली नाही.
- राजेश पाटणे, अध्यक्ष, के. के. मार्केट व्यापारी संघटना
नाट्यगृहाच्या पार्किंगची कसून पाहणी करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी जवानांना आढळलेली नाही. नागरिक सांगतात त्याप्रमाणे पाहणी सुरू आहे.
- प्रमोद सोनावणे, अग्निशामक दल अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.