ओझर्डेच्या ‘होम पिच’वर मकरंद पाटलांच्या तटबंदी मजबूत
विरोधकांसमोर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडण्याचे मोठे आव्हान
पुरुषोत्तम डेरे ः सकाळ छायाचित्रसेवा
कवठे, ता. २० ः वाई तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या ओझर्डे (पूर्वीचा कवठे) जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांचा हा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. यावेळेस हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने प्रस्थापितांची गणिते बदलली असून, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडण्याचे मोठे आव्हान विरोधकांसमोर उभे ठाकले आहे.
मागील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने गट व गणाच्या जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. यावर्षीच्या निवडणुकीत ओझर्डे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. ओझर्डे पंचायत समिती गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर केंजळ गण हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीत जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या नेत्यांना हिरमोड झाला असून, त्यांना आता पुढील निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांची गटात व गणात असणारी भाऊगर्दी यावेळी दिसून येत नाही. गटातून व गणातून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी सल्लामसलत सुरू आहे, तर विरोधी भाजप, शिवसेना या पक्षांच्या गोटात मात्र निवडणूक जाहीर होऊनही शांतता दिसून येते. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप अशीच लढत होणार असल्याचे दिसून येते; परंतु राष्ट्रवादीला शह देण्यासाठी इतर पक्ष एकत्रित उमेदवार देणार, की स्वतंत्रपणे लढणार आहे याचीही उत्सुकता आहे.
गटात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, गटाची एकूण मतदार संख्या ३८ हजार ५७५ एवढी आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी पांडेच्या सरपंच चेतना किरण जाधव, यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा वृषाली ललित चव्हाण यांच्यात रस्सीखेच आहे, तर काँग्रेसकडून महिला जिल्हाध्यक्षा अल्पना प्रताप यादव, भाजपकडून दीपाली केशव पिसाळ, जयश्री प्रवीण जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ओझर्डे गणात राष्ट्रवादी पक्षातील इच्छुकांची संख्या मर्यादित असली, तरी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केले आहे. पक्षातर्फे गणातही नवखा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे, तर विरोधात भाजपतून उमेदवारी शोधमोहीम सुरू असून, जुना की नवीन कार्यकर्ता याची चाचपणी केली जात आहे. केंजळ या गणातून राष्ट्रवादीकडून केंजळचे विलास गायकवाड, शैलेश सपकाळ, नवनाथ सोनटक्के, अनिल ठोंबरे आदींनी उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, तर विरोधकांच्यातून कोण उमेदवार असेल याची उत्सुकता आहे. या गणात केंजळ किंवा सुरूर या गावातून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
मंत्री पाटील यांचे होम पीच असलेल्या ओझर्डे गटाने त्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भरभक्कम साथ दिली आहे. गटातील बहुतांश ग्रामपंचायती, विकास सेवा सोसायट्यांवर त्यांचेच वर्चस्व आहे. तळागळातून सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे राष्ट्रवादीने या गटावर कायम निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे, तर माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजप म्हणजेच पू्र्वीची काँग्रेस पक्षाची काही मोजक्याच गावात राजकीय सत्ता होती; परंतु गत काही वर्षांत त्याला सुरुंग लागल्याने विरोधकांना निवडणुकींना लोकांसमोर जाताना खूपच मर्यादा येतात. त्यातच मदन भोसले यांनी व इतर पक्षातील नेत्यांनी या गटात फारसा संपर्क ठेवला नसल्याने लोकांच्यात नाराजी होऊन त्याचा फटका त्यांना प्रत्येक निवडणुकीत बसतो. भाजपला पक्षासाठी आंदोलन करणारे जुने कार्यकर्ते व नवीन प्रवेश केलेल्या मदन भोसले यांच्या कार्यकर्ते यांच्यात समन्वय ठेवून उमेदवारी द्यावी लागणार आहे. भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी रस्सीखेच दिसून येत नसली, तरी बरेच जण वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहेत. या गटात राष्ट्रवादीच्या विरोधात गत तीन ते चार निवडणुकांत प्रताप यादव व अल्पना यादव यांनीच विरोधी पक्षाचा आदेश मानून उमेदवारीची धुरा सांभाळली होती. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांची राजकीय भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.
फोटो ः मकरंद पाटील, नितीन पाटील, मदन भोसले, अल्पना यादव हे फोटो घेणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.